प्रकल्पग्रस्ताचे बोगस प्रमाणपत्र बनविणारा मुख्य सूत्रधार पोलिसांच्या जाळ्यात
By रूपेश उत्तरवार | Published: May 29, 2023 07:02 PM2023-05-29T19:02:45+5:302023-05-29T19:03:15+5:30
Yawatmal News यवतमाळात बोगस प्रमाणपत्र प्रकरणात मुख्य सूत्रधार पोलिसांच्या ताब्यात सापडला आहे. त्याच्याकडून इतरही प्रकरणात माहिती पुढे येण्याची शक्यता पोलिस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांनी पत्रकार परिषदेतून दिली.
रूपेश उत्तरवार
यवतमाळ : संपूर्ण राज्यभरात प्रकल्पग्रस्तांचे बोगस प्रमाणपत्र देऊन फसवणूक करण्याच्या घटना वाढत आहे. यामुळे भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांच्या प्रमाणपत्राची छाननी करण्याचे आदेश पोलिस महानिरीक्षकांनी दिले होते. यवतमाळात अशा बोगस प्रमाणपत्र प्रकरणात मुख्य सूत्रधार पोलिसांच्या ताब्यात सापडला आहे. त्याच्याकडून इतरही प्रकरणात माहिती पुढे येण्याची शक्यता पोलिस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांनी पत्रकार परिषदेतून दिली.
यवतमाळ जिल्ह्यात चालक-शिपाई पदाच्या ५८ जागा आणि पोलिस शिपाई पदाच्या २४४ जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. या भरती प्रक्रियेसाठी प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, त्याचप्रमाणे इतर आरक्षण निश्चित करण्यात आले होते. याच आरक्षणाचा फायदा घेऊन उमेदवारांना बोगस प्रमाणपत्र बनवून देणारी टोळी सक्रिय असल्याची बाबही पुढे आली आहे. राज्यात काही ठिकाणी असे बोगस प्रमाणपत्र निष्पन्न झाले आहे. यामुळे विशेष पाेलिस महानिरीक्षक, प्रशिक्षण व खास पथके यांनी पोलिस घटकांंना प्रमाणपत्रांची छाननी करण्याच्या सूचना दिल्या. यवतमाळमध्ये चार उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात आली. यामधील किशोर किसन तोरकड बोरी वन येथील प्रकल्पग्रस्ताचे प्रमाणपत्र बोगस असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणात पोलिसांनी कलम ४१९, ४२०, ४६७, ४६८, ४७१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी किशोर तोरकड याला न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली होती.
यावेळी त्याने सोलापूर जिल्ह्यातील बार्शीमध्ये असलेले शिक्षक नवनाथ शहाजी कदम यांच्याकडून हे प्रमाणपत्र बनविल्याचे मान्य केले. यामुळे पोलिस अधीक्षकांनी दराटी ठाणेदार भरत चापाईतकर आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक सागर भारस्कर यांच्या नेतृत्वात दोन पथके तयार करण्यात आली. त्यांनी बार्शी येथे आरोपीचा शोध घेतला आणि त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरून इतरही प्रकरणात शोध घेणे सुरू आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. पवन बनसोड, अपर पोलिस अधीक्षक पीयूष जगताप, पोलिस निरीक्षक प्रदीप परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहपोलिस निरीक्षक भरत चापाईतकर, पोलिस उपनिरीक्षक सागर भारस्कर, पोलिस अंमलदार संभाजी केंद्रे, सोहेल मिर्झा, ताज मोहंमद यांच्या पथकाने ही कारवाई पूर्ण केली.