‘मेडिकल’ डाॅक्टरने रुग्णााच्या आईला लावली कानशिलात
By सुरेंद्र राऊत | Published: May 16, 2024 08:22 PM2024-05-16T20:22:53+5:302024-05-16T20:23:05+5:30
प्रशासनाकडून चाैकशी समिती : ऑल इंडिया पँथर सेनेची आक्रमक भूमिका
यवतमाळ: येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मुलासाेबत असलेल्या आईला निवासी डाॅक्टरने कानशिलात मारली. हा प्रकार गुरुवारी सकाळी ७ वजता घडला. या घटनेनंतर महिलेचे संतप्त नातेवाईक व ऑल इंडिया पँथर सेनेचे पदाधिकारी रुग्णालयात पाेहाेचले. त्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने त्यात तत्काळ चाैकशी समिती गठीत करून चाैकशी सुरू केली आहे.
श्याम ज्ञानेश्वर तिजारे (३८) हा रुग्णालयातील जुन्या इमारतीत असलेल्या वाॅर्ड क्रं. २७-२८ मध्ये भरती हाेता. त्याच्यावर तीन दिवसांपासून उपचार सुरू हाेते. त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला लाईफ सपाेर्टवर ठेवण्यात आले हाेते. गुरूवारी सकाळी ७ वाजता वाॅर्डमध्ये कनिष्ठ निवासी वैद्यकीय अधिकारी डॅ. गाैरव जैन आले असता, त्यांना लाईफ सपाेर्टर मशिनचे बटन बंद दिसले, मशीन बंद केल्याने श्यामची प्रकृती आणखी बिघडली.
बटण काेणी बंद केले याबाबत डाॅक्टरने विचारणा केली, यातूनच श्यामच्या आईचा डाॅ. गाैरव जैन याच्याशी वाद झाला. दरम्यान श्यामची प्रकृती अधिक गंभीर हाेवून त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर डाॅ. गाैरव याने आपल्या कानशिलात मारली असा आराेप अन्नपूर्णाबाई यांनी केला. महिलेने ही घटना नातेवाईकांना सांगताच त्यांनी पँथर सेनेच्या पदाधिकाऱ्यांना साेबत घेऊन शासकीय रुग्णालय गाठले. डाॅक्टरने मारहाण का केली, याचा जाब विचारण्यात आला. कारवाई करा अन्यथा उग्र आंदाेलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला.
त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने तातडीने या प्रकरणात प्राप्त तक्रारीवरून चाैकशी करण्याचा निर्णय घेतला. वैद्यकीय अधिक्षक डाॅ. सुरेंद्र भुयार, श्वसनविकारशास्त्र विभागाचे प्राध्यापक डाॅ. रवींद्र राठाेड, उपवैद्यकीय अधिक्षक डाॅ. दुर्गेश देशमुख यांचा या समितीत समावेश आहे. समितीच्या अहवालानंतर कनिष्ठ निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यावर काेणती कारवाई केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
रुग्णाच्या आईला मारहाण केल्याची तक्रार प्राप्त झाली. या प्रकरणाची चाैकशी करण्यासाठी समिती गठीत केली आहे. यात दाेषी आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल.डाॅ. गिरीश जतकर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय.