सहायक आयुक्ताच्या मृत्यूचे गूढ दोन वर्षांनंतर उकलणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2022 05:00 AM2022-03-16T05:00:00+5:302022-03-16T05:00:02+5:30

सहायक विक्रीकर आयुक्त शरद सुधाकर खंडाळीकर यांचा २५ ऑगस्ट २०२० ला रात्री २.३० वाजता मृत्यू झाला. त्यांना मारहाण केल्याच्या खुना शरीरावर होत्या. या प्रकरणी आयुक्तांचा भाऊ सुरेंद्र सुधाकर खंडाळीकर रा. राजनगर, नांदेड याने लोहारा पोलीस स्टेशनला २९ ऑगस्ट २०२० रोजी भावाचा खून झाल्याची तक्रार दिली. या तक्रारीमध्ये शरदची पत्नी तत्कालीन राळेगाव उपविभागीय अधिकारी यांच्यासह सात जणांविरुद्ध संगनमताने कट रचून भावाचा खून केल्याची तक्रार दिली. मात्र या तक्रारीची लोहारा पोलिसांनी दखल घेतली नाही.

The mystery of Assistant Commissioner's death will be solved after two years | सहायक आयुक्ताच्या मृत्यूचे गूढ दोन वर्षांनंतर उकलणार

सहायक आयुक्ताच्या मृत्यूचे गूढ दोन वर्षांनंतर उकलणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात २०२० मध्ये उच्च पदावर कार्यरत असलेल्या अधिकारी दाम्पत्यामध्ये वाद सुरू झाले. उपजिल्हाधिकारी असलेली पत्नी प्रसूतीनंतर मुलीला घेऊन माहेरी गेली ती परतलीच नाही. या ताणाताणीत सहायक आयुक्त असलेला पती प्रचंड मानसिक दबावात आला. त्याची प्रकृती ढासळत गेली. अशाही स्थितीत पत्नीकडून जाच सुरूच होता. यातच यवतमाळात आला असताना त्याचा मृत्यू झाला. २५ ऑगस्ट २०२० मध्ये ही घटना घडली. या प्रकरणी आयुक्ताच्या भावाने संशय व्यक्त करत पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मात्र या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनीही तक्रार अर्ज फेटाळला. जिल्हा सत्र न्यायालयात तक्रार अर्जाची दखल घेऊन पोलिसांनी या प्रकरणात गुन्हे नोंदवून तपास करावा, असा आदेश दिला.
सहायक विक्रीकर आयुक्त शरद सुधाकर खंडाळीकर यांचा २५ ऑगस्ट २०२० ला रात्री २.३० वाजता मृत्यू झाला. त्यांना मारहाण केल्याच्या खुना शरीरावर होत्या. या प्रकरणी आयुक्तांचा भाऊ सुरेंद्र सुधाकर खंडाळीकर रा. राजनगर, नांदेड याने लोहारा पोलीस स्टेशनला २९ ऑगस्ट २०२० रोजी भावाचा खून झाल्याची तक्रार दिली. या तक्रारीमध्ये शरदची पत्नी तत्कालीन राळेगाव उपविभागीय अधिकारी यांच्यासह सात जणांविरुद्ध संगनमताने कट रचून भावाचा खून केल्याची तक्रार दिली. मात्र या तक्रारीची लोहारा पोलिसांनी दखल घेतली नाही. त्यामुळे न्याय मिळविण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करण्यात आली. तेथूनही न्याय मिळाला नाही. अखेर जिल्हा न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायदंडाधिकाऱ्यांनी तक्रार अर्ज फेटाळून लावत पाेलीस तपासाची गरज नसल्याचे मत नोंदवून थेट खटला चालविण्याचा आदेश दिला. या आदेशाविरोधात जिल्हा सत्र न्यायाधीश जी. जी. भन्साली यांच्या न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. या खटल्यात याचिकाकर्त्याच्या वतीने सुधाकर नारायण खंडाळीकर यांच्या बाजूने ॲड. इम्रान देशमुख यांनी युक्तिवाद केला. यावेळी न्यायालयापुढे शरदचा मृत्यू नैसर्गिक नसून तो खून असल्याचे सांगण्यात आले. त्यासाठी शवचिकित्सा अहवालाचा हवाला देण्यात आला. तसेच मृत शरदच्या शरीरावर मारहाणीच्या जखमा असल्याचेही न्यायालयापुढे सांगण्यात आले. अपिलकर्त्यांच युक्तिवाद ऐकून न्यायाधीश जी. जी. भन्साली यांनी या प्रकरणात पोलिसांनी तपास करून गुन्हे दाखल करावे, असा आदेश १८ फेब्रुवारीला दिला. या खटल्यात ॲड. इम्रान देशमुख यांना ॲड. युवराज धांदे, ॲड. शाहरुख सैयद यांनी सहकार्य केले. 

जिल्हा सत्र न्यायालयाच्या आदेशाने गुन्हे नोंदविणार
जिल्हा सत्र न्यायालयाचा आदेश प्राप्त झाला आहे. सुरुवातीच्या तक्रारीमध्ये सात आरोपींची नावे होती, तर न्यायालयात केलेल्या याचिकेमध्ये १३ आरोपी आहेत. याची फिर्याद दाखल करण्यासाठी फिर्यादींशी संपर्क करण्यात आला आहे. फिर्यादी आल्यानंतर या प्रकरणात कट रचून खून केल्याचा गुन्हा दाखल केला जाईल व त्या दिशेने तपास करून पुढील कारवाई करण्यात येईल. 
- दीपमाला भेंडे, 
ठाणेदार, लोहारा पोलीस ठाणे
 

 

Web Title: The mystery of Assistant Commissioner's death will be solved after two years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.