प्रेयसीच्या पतीची सुपारी देऊन हत्या; दोघांना अटक, एक पसार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2023 12:44 PM2023-08-04T12:44:38+5:302023-08-04T12:47:33+5:30

दारव्हा येथील खुनाचे गूढ उलगडले

The mystery of the murder in Darwha was solved : Boyfriend kills girlfriend's husband, two arrested one absconding | प्रेयसीच्या पतीची सुपारी देऊन हत्या; दोघांना अटक, एक पसार

प्रेयसीच्या पतीची सुपारी देऊन हत्या; दोघांना अटक, एक पसार

googlenewsNext

यवतमाळ : दारव्हा शहरालगतच्या कुपटा मार्गावर मंगळवारी रात्री एक युवक रक्ताच्या थारोळ्यात पडून असल्याची माहिती पोलिस ठाण्यात आली. पोलिस घटनास्थळी जाऊन त्या जखमीला तातडीने रुग्णालयात दाखल केले. बुधवारी त्याचा उपचारादरम्यान यवतमाळ येथे मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिस पथकांनी तपास हाती घेत २४ तासांत गुन्हा उघड केला. प्रियकराने प्रेयसीच्या पतीची सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याचे उघड झाले. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून एक जण पसार आहे.

उमेश सदाशिव चव्हाण (२७, रा. मांगकिन्ही) असे मृताचे नाव आहे. यातील आरोपी शंकर प्रेमसिंग चव्हाण (२२) याचे उमेशच्या पत्नीसोबत प्रेमसंबंध होते. उमेश पत्नीला मारहाण करतो हे शंकरला खटकत होते. दारव्हा पोलिसांनी सर्वप्रथम शंकर चव्हाण याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. सुरुवातीला शंकरने उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर संपूर्ण घटनाक्रम सांगितला. उमेशला संपविण्यासाठी नेर तालुक्यातील रामा शंकर जाधव (२९, रा. सिंदखेड) व त्याच्या एका साथीदाराला ३० हजार रुपयांची सुपारी दिल्याचे सांगितले. त्यावरून पोलिसांनी रामा जाधव याला अटक केली, तर त्याचा साथीदार घटनेपासून पसार झाला.

या प्रकरणी कट रचून खून केल्याचा गुन्हा दारव्हा पोलिसांनी दाखल केला आहे. अटकेतील आरोपींंना न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक विलास कुलकर्णी, उपनिरीक्षक धनंजय रत्नपारखी, सुनील राठोड, रवी मोर्लेवार, सुशील चेके, सुरेश राठोड, अमोल साेनुने करीत आहेत.

महिनाभरापासून आरोपी होते संधीच्या शोधात; अज्ञातांनी हल्ला केल्याचा बनाव

उमेश चव्हाण याच्यासोबत शेवटी कोण याचा शोध घेतला असता आरोपी शंकर प्रेमसिंग चव्हाण असल्याचे पुढे आले. पोलिसांनी त्याची चौकशी असता सुरुवातीला त्याने अज्ञातांनी हल्ला करून ते दुचाकी व मोबाईल घेवून पळून गेल्याचा बनाव केला. घटनेची माहिती पोलिसात का दिली नाही या एका मुद्यावर आरोपी शंकर अडकला. नंतर त्याने गुन्हा कबूल करीत महिनाभरापासून उमेशच्या हत्येची संधी शोधत असल्याचेही त्याने सांगितले.

Web Title: The mystery of the murder in Darwha was solved : Boyfriend kills girlfriend's husband, two arrested one absconding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.