रायगडावर होणार महात्मा फुलेंच्या नावाचा उल्लेख
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 06:31 PM2024-05-20T18:31:27+5:302024-05-20T18:31:58+5:30
Yavatmal : पुरातत्त्व विभागाने घेतली मागणीची दखल
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ :रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी आहे. याचा शोध महात्मा फुले यांनी १८६९ ला घेतला. मात्र रायगडावर तशी पाटीदेखील नाही. यामुळे यवतमाळातील अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या अध्यक्षा सुनयना यवतकर यांनी मुख्यमंत्र्याकडे तक्रार नोंदविली. या तक्रारीची पुरातत्त्व विभागाने दखल घेतली आहे. यासंदर्भात कारवाई करण्याच्या सूचना डॉ. तेजस गर्गे यांनी दिल्या आहेत. याविषयाचे पत्र त्यांनी यवतकर यांना पाठविले आहे.
अखिल भारतीय समता परिषदेच्या जिल्हाध्यक्ष सुनयना यवतकर तसेच सामाजिक कार्यकर्ते व जोतिबा दीनबंधू कल्याण मंडळ यवतमाळचे सचिव संजय यवतकर यांनी रायगड किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधिस्थळाला भेट दिली. या वेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्या ठिकाणी याबाबत चौकशी केली असता इथे महात्मा जोतीराव फुले यांच्या नावाचा कुठेही उल्लेख आढळला नाही.
त्यांनी याबाबत रायगडावर माहिती विचारली होती. परंतु अपेक्षित उत्तर मिळाले नाही. त्यामुळे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या यवतमाळ जिल्हाध्यक्ष सुनयना संजय यवतकर यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार, अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे पत्रव्यवहार केला. यासंदर्भात कार्यवाहीची मागणी केली.
यासंदर्भात त्यांनी शासनाकडे पत्रव्यवहार केला. समाधीचे शोधक म्हणून महात्मा जोतीराव फुले यांच्या नावाचा उल्लेख असलेली ग्रॅनाईट पाटी लावण्यात यावी, अशी मागणी शासनाकडे केली. शासनाने यासंदर्भात पुरातत्त्व व वस्तू संग्रहालय संचालनालय मुंबई यांच्याकडे पत्रव्यवहार केला. पुरातत्त्व वस्तुसंग्रहालय संचालनालय मुंबईचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांनी पुढील कारवाई करण्यासाठी नुकतेच निर्देश दिलेले आहेत. व असे निर्देश दिले असल्याची पोच सुनयना संजय यवतकर यांना पत्राद्वारे कळविले आहे.