प्रशासनाने जाणल्या शेतकऱ्यांच्या व्यथा; येत्या पाच दिवसात आंदोलनाची पुढील दिशा ठरविली जाणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 04:53 PM2024-09-21T16:53:19+5:302024-09-21T16:54:40+5:30
Yavatmal : अन्नत्याग आंदोलनाची दखल घेत शेतकऱ्यांच्या मागण्या आणि समस्या सोडवण्याचा प्रयत्न
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी बैठक बोलावली. ही बैठक सकारात्मक असली तरी बहुतांश मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन कायम ठेवण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी शेतकरी पुत्रांची जिल्हा प्रशासनासोबत बैठक झाली. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अनेक प्रश्न निकाली काढण्यात आले; तर अनेक प्रश्न धोरणात्मक असल्याने त्यावर राज्यस्तरावर निर्णय होणे अपेक्षित आहे.
सोयाबीन-कापूस दरवाढ, पीकविमा, अतिवृष्टीची पूर्णता नुकसानभरपाई, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, जंगली जनावरांपासून संरक्षणासाठी शेतीला मजबूत कंपौंड यांसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी कृष्णा पुसनाके, सचिन मनवर व कृषी अभ्यासक प्रा. पंढरी पाठे यांनी यवतमाळ येथे आझाद मैदानात अन्नत्याग आंदोलन केले होते.
या आंदोलनाची दखल घेत जिल्हा प्रशासनाने बैठक आयोजित केली होती. यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक प्रमोद लहाळे, जिल्हा पणन अधिकारी अर्चना माळवे, अग्रणी बँक प्रबंधक अमर गजभिये, निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सतीश मून, उपविभागीय अधिकारी गोपाळ देशपांडे, अॅड. जयसिंग चव्हाण यांसह विमा कंपन्यांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थितीत होते.
तब्बल दीड तास ही बैठक चालली. या बैठकीत प्रा. पंढरी पाठे यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या आणि समस्या सविस्तरपणे मांडल्या. छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना व महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेमध्ये अनेक शेतकऱ्यांचे पैसे सरकारकडे बाकी आहेत. जंगली जनावरांच्या त्रासापासून मुक्तता होण्यासाठी शेतीला मजबूत कंपौंडच्या योजनेचा प्रस्ताव उपवनसंरक्षक यांच्या माध्यमातून कॅबिनेटकडे पाठवू, असे सांगण्यात आले. यावेळी विविध प्रश्नांवर शेतकऱ्यांनी आपले मत मांडले.
यावेळी माजी मुख्याध्यापक ज्ञानेश्वर गायकवाड, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण देशमुख, प्रा. निनाद सुरपाम, ऋषिकेश सराफ, प्रज्ज्वल तुरकाने, नितीन मिर्झापुरे, तर सहकारी म्हणून शेतकरी प्रकाश कांबळे, राहुल भानावत, अनिल चवरे, अभय अनासाने, अनिकेत हांडे, प्रशांत कुटे यांची उपस्थिती होती.
मध्यप्रदेशाप्रमाणे यवतमाळात आंदोलन
मागण्या पदरात पडत नाहीत तोपर्यंत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच राहणार आहे. पुढील चार ते पाच दिवसांत समोरील आंदोलनाची दिशा ठरणार आहे. मध्यप्रदेशमध्ये जसे आंदोलन सुरू आहे, तसेच आंदोलन महाराष्ट्रातही होणार असल्याचे आंदोलकांनी यावेळी स्पष्ट केले.