भागीदारांनीच केली आठ कोटी रुपयांची फसवणूक; परस्पर वळविली रक्कम
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 04:19 PM2023-08-23T16:19:50+5:302023-08-23T16:20:51+5:30
आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल : प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे काम
यवतमाळ : प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेची कामे घेण्यासाठी दोघांनी भागीदारी केली. त्या मित्रांमध्येच व्यवहारातील हिशेबाचा वाद झाला. यात दुसऱ्याने परस्पर खोटे दस्तऐवज तयार करून ८ कोटी ३० हजार ५४० रुपये आपल्या बँक खात्यात वळते करून घेतले. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर आठजणांविरुद्ध फसवणूक झाल्याची तक्रार अवधूतवाडी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली.
शरद सुभाषचंद्र भुत (रा. बाजोरियानगर) यांनी अनिल सीताराम सेवदा (रा. जिरापुरे ले-आऊट, अमराई यांच्यासोबत भागीदारीत श्री श्यामबाबा इंजिनिअर्स ॲन्ड कॉन्ट्रॅक्टर या नावाने कंपनी सुरू केली. यातून विविध ठिकाणी शासकीय कंत्राट मिळवत प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे काम सुरू केले. अमरावती, गडचिरोली जिल्ह्यात या भागीदारीतील कंस्ट्रक्शन कंपनीने कामे केली. अनिल सेवदा व शरद भुत या दोघांचे संयुक्त बँक खाते निविदेसोबत देण्यात आले होते. त्यातच केलेल्या कामाचा मोबदला आठ कोटी रुपये जमा झाला. मात्र नंतर अनिल सेवदा यांनी संगनमत करून गडचिरोली येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखा व्यवस्थापक, अचलपूर जि. अमरावती कार्यकारी अभियंता, गडचिरोली येथील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता, रमेश पी. गंपावार रा. एटापल्ली जि. गडचिरोली, प्रताप व्यंकट स्वामी कोलमपल्ली रा.
सिरोंचा, चुन्नीलालजी दुर्गाप्रसाद शर्मा रा. धारणी या सर्वांनी संगनमताने संयुक्त बँक खात्यात कामाचा मोबादला जमा केला नाही. परस्पर इतर खात्यांमध्ये ही रक्कम वळती केली, असा आरोप तक्रार शरद भुत यांनी केला आहे. या प्रकरणी बनावट बँक खाते व दस्त याचा वापरही केल्याचा आरोप आहे. यावरून अवधूतवाडी पोलिस ठाण्यात अनिल सेवदासह आठजणांविरुद्ध कलम ४२०, ४६५, ४६८, ४७१, ४०६, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. याचा तपास ठाणेदार ज्ञानोबा देवकते यांच्या मार्गदर्शनात सहायक निरीक्षक धिरेंद्रसिंग बिलावल करीत आहे.
गडचिरोली, अमरावती जिल्ह्यात बांधले रस्ते
रस्ते बांधकामाचे कंत्राट संयुक्तरित्या घेतले होते. त्याचा मोबदला मात्र परस्पर वळता करून घेण्यात आला. या कंत्राटदाराच्या कंपनीने गडचिरोली व अमरावती या दोन जिल्ह्यांमध्ये काम केल्याचे तक्रारीत नमूद आहे.