चोरट्यांच्या जाचामुळे ढळतोय शेतकऱ्यांचा संयम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2022 10:55 PM2022-11-15T22:55:29+5:302022-11-15T22:57:07+5:30

जिल्ह्यातील कोणत्याच तालुक्यातील शेतशिवार चोरांपासून सुरक्षित नाही. काही दिवसांपूर्वी कधी तरी शिवारात चोरीची घटना घडत होती. आता मात्र हा प्रकार नित्याचाच झाला आहे. शेतातील विहिरी, बोअरवेल यावर लावलेले मोटारपंप, त्याचे केबल, स्टार्टर हे सर्रास चोरीला जात आहे. चोरटे अधिकच बिनधास्त झाले असून तुषार संच, ठिबक संचाचे पाइपसुद्धा उखडून घेऊन जात आहे. रात्रंदिवस शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यावर हे नवे संकट उभे ठाकले आहे.

The patience of the farmers is eroding due to the persecution of thieves | चोरट्यांच्या जाचामुळे ढळतोय शेतकऱ्यांचा संयम

चोरट्यांच्या जाचामुळे ढळतोय शेतकऱ्यांचा संयम

Next

सुरेंद्र राऊत
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : निसर्गाशी दोन हात करून शेतकरी आपले काळे शिवार हिरव करतो. अन्नदाता म्हणून वाट्याला येणारी दु:ख व कष्ट मुकाट सोसतो. व्यवस्थाही त्याची वारंवार कसोटी पाहते. अशा शेतकऱ्यांचा आता संयम सुटायला लागला आहे. शेती साहित्य, धान्य, जनावरे चोरीच्या घटना नित्याच्याच झाल्या आहेत. हे नवे संकट परतवून लावण्यासाठी शेतकऱ्यांनी हातात काठी घेतली तर अघटित घडते, अशीच घटना बाभूळगाव तालुक्यातील मादणी येथे घडली. हकनाक शेतकरी खुनाचे आरोपी झाले. 
जिल्ह्यातील कोणत्याच तालुक्यातील शेतशिवार चोरांपासून सुरक्षित नाही. काही दिवसांपूर्वी कधी तरी शिवारात चोरीची घटना घडत होती. आता मात्र हा प्रकार नित्याचाच झाला आहे. शेतातील विहिरी, बोअरवेल यावर लावलेले मोटारपंप, त्याचे केबल, स्टार्टर हे सर्रास चोरीला जात आहे. चोरटे अधिकच बिनधास्त झाले असून तुषार संच, ठिबक संचाचे पाइपसुद्धा उखडून घेऊन जात आहे. रात्रंदिवस शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यावर हे नवे संकट उभे ठाकले आहे. गोठ्यातील गाय, म्हैस, बैल ही जनावरेसुद्धा सुरक्षित नाहीत. 
आता सध्या रब्बी हंगामाची तयारी शेतकरी करीत आहेत. रब्बीच्या हंगामात सिंचनासाठी मोटारपंप व तुषार संचाची गरज भासते. यंदा मुसळधार कोसळलेल्या पावसाने खरीप हंगामात शेतकऱ्यांची पुरती दैना केली. झालेले नुकसान निघणार नाही, मात्र पुढील काही दिवस व्यवहार चालविता येईल इतके उत्पन्न रब्बीतून मिळावे या आशेने शेतकरी पुन्हा कष्ट उपसायला तयार झाला आहे. त्याला चोरट्यांकडून खोडा घातला जात आहे.  पोलिस ठाण्यांमध्ये दररोज कृषी साहित्य चोरीच्या तक्रारी  दाखल होतात. पोलिसांकडून याची गांभीर्याने दखल घेतली जात नाही. चोरी गेलेल्या कृषी साहित्याची किंमत पोलिसांच्या लेखी फार कमी आहे. मात्र हंगामात हातचे अवजार निघून गेले तर किती नुकसान होते, काय अडचणी सोसाव्या लागतात, हे शेतकऱ्यांनाच ठावूक आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांचा चोरट्यांवरील राग वाढला आहे. हाती लागला तर बेदम मारहाणीत शेतकरी आरोपी होत आहेत. 
मादणी येथे सोयाबीन चोरीच्या संशयातूनच एकाला शिवारात नेऊन हातपाय बांधून बदडला. यात त्याचा जीव गेला. तिघे जण खुनाच्या गुन्ह्यात आरोपी झाले. अशा घटना भविष्यात होऊ नये यासाठी पोलिसांनी कृषी साहित्य चोरणाऱ्यांचा कडक बंदोबस्त करणे गरजेचे आहे. 
 

शेतकरी म्हणतात, पोलिसांचा धाक नाही 

माझ्या शेतातून आतापर्यंत सात मोटारपंप चोरीला गेले. चारवेळा तक्रार दिली. पोलिसांची   काहीच कारवाई नाही. त्यानंतर तीनवेळा मोटारपंप चोरीस जाऊनही तक्रार केली नाही. चोरट्यांवर पोलिसांचा  धाक नाही. आम्ही शेतकरी भीतीच्या सावटात जगत आहोत. तक्रार घेण्यासही पोलिस टाळाटाळ करतात.
- संजय रावेकर, शेतकरी, कळंब

दोनवेळा मोटारपंप व शेतीपयोगी साहित्य चोरीला गेले. शेतातील पाइप पोलिसांनी तपासाकरिता नेले. आता तेही द्यायला तयार नाहीत. मोटारपंप चोरीला जाऊ नये, असे वाटत असले तर शेतात जाऊन झोपत जा, असा उलट सल्ला पोलीस देतात.आता आम्ही दाद तरी कोणाकडे मागायची.
- ज्ञानेश्वर केशव लोखंडे, शेतकरी, कळंब

शेतातून तीन मोटार पंपाची चोरी झाली. प्रत्येक वेळा तक्रार दिली. काहीच उपयोग झाला नाही. उलट पोलिस म्हणतात, सुगावा लागला तर सांगा. माहिती दिली तर तपास करीत नाहीत. वारंवारच्या चोरीमुळे आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. भीतीच्या सावटात जगत आहोत.
- प्रवीण राऊत शेतकरी, कोठा

आजूबाजूच्या शेतातील मोटारपंप चोरीस जात आहे. त्यामुळे आम्हाला आमचे मोटारपंप सुरक्षित राहील की नाही, याची काळजी असते. वारंवार शेतात चकरा माराव्या लागत आहे. यामध्ये अधिकचा वेळ जातो. मोटार चोरांची टोळी पकडून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. 
- प्रल्हाद पांडुरंग झामरे शेतकरी, बोरीमहल

 

Web Title: The patience of the farmers is eroding due to the persecution of thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Thiefचोर