ग्राहक बनून गेल्यामुळे पोलिसांना मिळाला दुचाकी चोर
By सुरेंद्र राऊत | Published: May 11, 2024 05:27 PM2024-05-11T17:27:41+5:302024-05-11T17:28:51+5:30
अवधूतवाडी पोलिसांची कारवाई : सहा दुचाकी केल्या जप्त
यवतमाळ : शहरात मोठ्या प्रमाणात दुचाकी चोरीचे सत्र सुरू होते. आरोपींचा शोध घेऊनही हाती काहीच लागत नव्हते. त्यामुळे पोलिसांनी स्वत:च डमी ग्राहक बनून स्वस्त किमतीत दुचाकी खरेदी करण्याचा प्रयत्न सुरू केला. काही दिवसानंतर याला यश आले. दुचाकी विक्रीसाठी एक युवक येथील बसस्थानक परिसरात आला. त्याच्याकडे दुचाकी व्यवहाराची बोलणी करून कागदपत्रांची मागणी केली. तो गडबडला अन् पोलिसांचा संशय खरा ठरला. त्याला तत्काळ ताब्यात घेऊन विचारपूस सुरू केली. त्याने एक नव्हे तब्बल सहा दुचाकी चोरल्याची कबुली दिली.
अमोल श्याम देहाणे (२६) रा. शिंदे महाराज मठ लोहारा असे आरोपीचे नाव आहे. १० मे रोजी रात्री १० वाजताच्या दरम्यान दुचाकी खरेदी-विक्रीचा व्यवहार ठरला. त्यानुसार अमोल हा दुचाकी विकण्यासाठी बसस्थानक परिसरात आला. तेथे त्याला पोलिसांनी रंगेहाथ ताब्यात घेतले. त्याने यवतमाळ अवधूतवाडी पोलिस ठाणे हद्दीतून तीन दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. तर यवतमाळ शहर ठाणे हद्दीतील एक, वर्धा येथील एक आणि अन्य ठिकाणावरून असा सहा दुचाकी लंपास केल्या होत्या.
ठाणेदार नरेश रणधीर यांच्या मार्गदर्शनात अवधूतवाडीतील गुन्हे शोध पथकाने तपासासाठी वेगळी शक्कल लढविली आणि चोर अलगद हाती लागला. ही कारवाई सहायक निरीक्षक रामकृष्ण भाकडे, सहायक निरीक्षक रोहित चौधरी, सहायक फौजदार गजानन वाटमोडे, जमादार विशाल भगत, रवी खांदवे, बलराम शुक्ला, प्रशांत गेडाम, रूपेश ढोबळे, कमलेश भोयर, सागर चिरडे, रशिख शेख आदींनी केली.