राजकीय भोंगा खणखणणार; नेतेमंडळी लागली कामाला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2022 05:00 AM2022-05-16T05:00:00+5:302022-05-16T05:00:19+5:30
जिल्ह्यातील आठ नगर परिषदांची मुदत डिसेंबर महिन्यात संपुष्टात आली. यात अ दर्जाची यवतमाळ, ब दर्जाच्या दिग्रस, पुसद, उमरखेड, वणी, क दर्जाच्या आर्णी, दारव्हा, घाटंजी या नगर परिषदांचा समावेश आहे. येथील निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यासाठी प्रशासनाची तयारी सुरू आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांसाठी कार्यक्रम जाहीर झालेला नसला तरी संभाव्य उमेदवारांकडून चाचपणी सुरू आहे. ६९ गट तयार होणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. नगर परिषदांच्या प्रभाग रचनांचा कार्यक्रम जाहीर झाला असून, त्या प्रभाग प्रारुपावर आक्षेप मागविण्यात आले आहेत. अंतिम प्रभाग रचना जून महिन्यात जाहीर केली जाणार आहे. जिल्हा परिषदेचा गट व गणाचा कार्यक्रम जाहीर होणे बाकी आहे. आयोगाने याबाबतचे प्रारूप मागितले आहे. यामुळे लवकरच निवडणुका होतील, अशी अपेक्षा आहे.
जिल्ह्यातील आठ नगर परिषदांची मुदत डिसेंबर महिन्यात संपुष्टात आली. यात अ दर्जाची यवतमाळ, ब दर्जाच्या दिग्रस, पुसद, उमरखेड, वणी, क दर्जाच्या आर्णी, दारव्हा, घाटंजी या नगर परिषदांचा समावेश आहे. येथील निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यासाठी प्रशासनाची तयारी सुरू आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांसाठी कार्यक्रम जाहीर झालेला नसला तरी संभाव्य उमेदवारांकडून चाचपणी सुरू आहे. ६९ गट तयार होणार आहेत. यावरून कुठला भाग आपल्या गटात येतो याचा अंदाज घेऊन उमेदवार तयारीला लागले आहेत. राजकीय पक्षही सक्षम पर्याय शाेधत आहेत.
पाच महिन्यांपासून नगरपालिकांवर प्रशासक
जिल्ह्यातील आठ नगरपालिकांची मुदत डिसेंबर महिन्यात संपली. जानेवारीपासून या पालिकांवर प्रशासक नियुक्त झाले आहेत. सहा महिन्यांपर्यंत प्रशासकीय कामकाज चालते. त्या आत निवडणूक घेणे क्रमप्राप्त आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समितीवर प्रशासक
जिल्हा परिषद, पंचायत समितीची मुदत मार्च महिन्यात संपुष्टात आली. तेव्हापासून तेथे प्रशासक नियुक्त करण्यात आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारीच प्रशासक म्हणून कारभार पाहत आहेत. तेथेही वेळेत निवडणुका घेण्याचे निर्देश आहेत.
गटाच्या प्रारुपाकडे नजरा
- जिल्हा परिषदेत आठ नवीन गटांची भर पडणार आहे. त्या दृष्टिकोनातून फेररचनेत बदल होईल. निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद गट प्रारुपाचा आराखडा मागितला.
- पंचायत समिती गणालाही नव्या सदस्य संख्येने फरक पडणार आहे. राजकीय समीकरण जुळविण्यासाठी प्रारूप कसे राहते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
नेतेमंडळी तयार
प्रत्येक विधानसभेतील नेते, तालुकाध्यक्ष कामाला लागले आहेत. गावातील कार्यकर्त्यांचे संघटन तयार आहे. जिल्हा परिषद, नगरपालिकेत काँग्रेस स्वबळावर येईल, याची तयारी केली जात आहे.
- -डाॅ. वजाहत मिर्झा, जिल्हाध्यक्ष काँग्रेस
जिल्ह्यातील पालिका व जिल्हा परिषदेच्या पूर्ण जागा राष्ट्रवादी लढणार आहे. तालुकानिहाय आढावा सभा, सभासद नोंदणी कार्यक्रम राबविला आहे.
- बाळासाहेब कामारकर,
जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
जनसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी मनसे नेहमीच तत्पर असते. त्यामुळे निवडणूक आल्यावर तयारी करण्याची गरज भासत नाही. स्वबळावर सर्व जागा लढणार आहे.
-राजू उंबरकर, राज्य उपाध्यक्ष, मनसे
भाजप निवडणूक संपताच पुढच्या तयारीला लागते. शक्ती केंद्र, बूथ रचना तयार आहे. यासाठी युवकांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. प्रत्येक गट प्रभारी नियुक्त केले आहेत.
-नितीन भुतडा, जिल्हाध्यक्ष, भाजप
शिवसेना निरंतर जनसामान्यांची कामे करीत असते. त्यामुळे निवडणूक आल्यावर कामाला लागणे असे काही प्रयोजन नाही. नगरपालिकेत व ग्रामीण भागात सतत कामात आहोत.
-पराग पिंगळे, जिल्हा प्रमुख शिवसेना