देश एकसंध ठेवण्याची ताकद संविधानातच : छगन भुजबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2022 10:40 AM2022-11-26T10:40:00+5:302022-11-26T10:41:09+5:30

स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा यांच्या स्मृती सोहळ्यात प्रतिपादन

The power to keep the country united is in the constitution itself - Chhagan Bhujbal | देश एकसंध ठेवण्याची ताकद संविधानातच : छगन भुजबळ

देश एकसंध ठेवण्याची ताकद संविधानातच : छगन भुजबळ

Next

यवतमाळ : गांधी, नेहरू, आंबेडकर ही नावे या देशाला कधीही विसरता येणार नाही. अनेक भाषा, अनेक धर्म असलेल्या या देशाला एकसंध ठेवण्याची ताकद केवळ आणि केवळ संविधानातच आहे, असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ यांनी केले.

ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा ‘लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जन्मशताब्दी वर्षातील २५व्या स्मृतिदिनानिमित्त भुजबळ शुक्रवारी यवतमाळात बोलत होते. बाबूजींचे समाधीस्थळ असलेल्या ‘प्रेरणास्थळा’वर शुक्रवारी सकाळी ‘आदरांजली’ कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना छगन भुजबळ म्हणाले, राज्य मंत्रिमंडळात असताना बाबूजींनी लोकमतमधून कधीच स्वत:चे राजकारण मांडले नाही. तेथे पत्रकारांना संपूर्ण स्वातंत्र्य दिले. त्यांनी लोकमतच्या संपादकांना चार वर्षे ११ महिने लोकांबरोबर असता, एक महिना मदत करा, अशी विनंती केली. यासाठी आदेश दिला नाही. हा आदर्श आजच्या माध्यमांमध्ये दिसत नाही. मात्र तो वसा विजय दर्डा आणि राजेंद्र दर्डा यांनी जोपासला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून तर सध्याच्या राजकीय परिस्थितीपर्यंत अनेक मुद्यांवर भुजबळ यांनी भाष्य केले.

ते म्हणाले, नेहरू-गांधींनी या देशासाठी काय केले, असे प्रश्न करणारे मेसेज मोबाइलवर पसरविले जातात. पण नेहरू-गांधींनी काय केले हे विचारणारे तुम्ही कोण? त्यावेळी स्वातंत्र्य संग्रामात तुम्ही तर नव्हतेच. मग प्रश्न विचारण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? सोनिया गांधींनी देशासाठी आपल्या सासूचा मृत्यू पाहिला, आपल्या पतीचा मृत्यू पाहिला. पण नंतर सत्ता आली तरी पंतप्रधानपद नाकारून डाॅ. मनमोहनसिंग यांना पंतप्रधानपदी बसविले. राहुल गांधींनी आपल्या आजीचा, वडिलांचा मृत्यू पाहिला. पण ते कधीही आमच्या कुटुंबाने देशासाठी अमूक बलिदान केले, असे सांगत बसत नाही. मात्र आजकाल अनेक जण मी भाजी विकली, मी चहा विकला, असे सांगून सहानुभूती मिळविताना दिसतात. गांधी-नेहरूंनी देशाची फाळणी केल्याची आवई उठविली जाते. मात्र ते करणे कसे क्रमप्राप्त होते, हे भुजबळ यांनी सोदाहरण पटवून दिले.

२००२ मध्ये अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना पार्लमेंटमध्ये आलेल्या साधूसंतांनी त्यांना ‘अखंड भारत’ मिळविण्यासाठी गळ घातली. मात्र वाजपेयींनी ‘भूमी तो आयेगी पर उसके साथ लोग भी आयेंगे’ असे म्हणताच अखंड भारताची मागणी मागे पडली. नेहरू-गांधी यांच्या सत्ताकाळात देशाने काय काय केले, यांची यादीच भुजबळ यांनी वाचून दाखविली. अन् शेवटी म्हणाले, मी सर्वच यादी वाचणार नाही, कारण याची माहिती मिळाली तर सध्याचे सत्ताधीश त्याही गोष्टी विकून टाकतील.

राहुल गांधी यांची पदयात्रा संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेत असल्याचे म्हणत त्यांनी कवयित्री नीरजा यांची कविता सादर केली. तर भाषणाचा शेवट करताना देशात परिवर्तन होणारच असल्याचे सांगताना ते म्हणाले,

रख हौसला वो मंजर भी आयेगा, प्यासे के पास समंदर भी आयेगा

थक कर न बैठ जीत भी मिलेगी, और जीतने का मजा भी आयेगा

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना ज्येष्ठ संपादक मधुकर भावे यांनी बाबूजी तसेच छगन भुजबळ यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकला. बाबूजींसारख्या कर्तृत्ववान माणसांची पावलं काळावर कायमची उमटलेली असतात. अनेक दैनिकं मुंबईत सुरू होऊन नंतर खेड्यात पोहोचली. पण ‘लोकमत’ हे एकमेव दैनिक आहे, जे यवतमाळसारख्या ठिकाणी सुरू होऊन मुंबईत, दिल्लीतही पोहोचले. राज्यातील पहिल्या क्रमांकाचे दैनिक बनले. ही सर्व किमया बाबूजींच्या कार्यशैलीमुळेच घडली. बाबूजींसारख्या लढवय्या व्यक्तीच्या स्मृतिदिनी छगन भुजबळ यांच्यासारखा लढवय्या नेता येणे महत्त्वाचे आहे. ते सत्तेत असो किंवा नसो, त्यांना वजा करून महाराष्ट्रात काहीही करता येत नाही.

यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, माजी राज्यमंत्री संजय देशमुख, लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन तथा माजी खासदार विजय दर्डा, लोकमतचे एडिटर-इन-चिफ तथा राज्याचे माजी शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्यासह ‘प्रेरणास्थळ’ फुलांनी आणि मुलांनी बहरले होते. शिवाय, बाबूजींवर प्रेम करणारा चाहतावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डाॅ. अजय कोलारकर यांनी केले, तर माजी आमदार कीर्ती गांधी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

स्वच्छ शब्दात भूमिका मांडणे हे बाबूजींचे वैशिष्ट्य

यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणाले, मी मंडल आयोगाच्या प्रश्नावर जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा सुधाकरराव नाईक आणि बाबूजींनी मला कॉंग्रेसमध्ये आणले. स्वच्छ शब्दात भूमिका मांडणे आणि आपले काम करीत राहणे, हे बाबूजींचे वैशिष्ट्य होते. त्यांची विचारसरणी अवलंबून आज संपूर्ण दर्डा कुटुंब एकोप्याने राहत आहे. आजच्या काळात ही फार दुर्मिळ बाब आहे. २५ वर्षांनंतरही लोक बाबूजींच्या प्रेरणास्थळावर आठवणीने येतात, ही साधी गोष्ट नाही. त्यासाठी समाजासाठी, देशासाठी लढावे लागते. पैसेवाले येतात आणि जातात, पण आठवणीत राहते ते केवळ काम.

Web Title: The power to keep the country united is in the constitution itself - Chhagan Bhujbal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.