वीज कोसळली अन् आई समोरच झाला मुलाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2022 05:00 AM2022-06-15T05:00:00+5:302022-06-15T05:00:10+5:30
दुपारी १.३०वाजताच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला. त्यामुळे दोघेही आडेश्यासाठी कडूनिंबाच्या झाडाखाली उभे राहिले. एकमेकांच्या विरोधी बाजूला उभे असताना झाडावर वीज कोसळली. त्यात गजानन आणि मारूती दोघेही जखमी होऊन खाली पडले. शिवारातील नागरिकांना त्यांना झरी येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. तेथे डाॅक्टरांनी गजाननला मृत घोषित केले. मारूती विजेच्या धक्क्याने प्रचंड प्रभावित झाला असून त्याच्या उपचार सुरु आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
रुंझा/झरी : पाऊस सुरू झाल्याने झाडाखाली थांबलेल्या शेतमजुरांपैकी दोघांचा वीज कोसळून मृत्यू झाला. तर सहा जणांचा जीव वाचला. ही घटना पांढरकवडा तालुक्यातील पाथरी येथे मंगळवारी दुपारी घडली. दरम्यान, या घटनेत आई समोरच २५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. विजेची आस लागल्याने मजुरांमधील एका मुलीचा पाय भाजला गेला.
पाथरी येथील शेतात टोबणीचे काम सुरू होते. दुपारच्या सुमारास अचानक पावसास सुरुवात झाली. विजेच्या गडगडाटासह पाऊस कोसळत होता. पाऊस आल्याने शेतात टोबणीचे काम करीत असलेल्या आठ जणांनी धुऱ्याला लागून असलेल्या झाडाचा आसरा घेतला. त्याच वेळी झाडावर वीज कोसळली. यात अक्षय ऊर्फ बबलू गोविंदा कांबळे (२५) व अभिषेक भास्कर मेश्राम (१७) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर शेजारीच उभी असलेली बबलूची आई शशिकला, गोविंदा कांबळे (५०), औत हाकणारे अविनाश चिंदू भोयर (३५), सोनू रवी कुडमथे, काजल भास्कर नान्हे, मानसी रामू दडांजे, साक्षी रामू दडांजे या सहा जणांचा जीव थोडक्यात वाचला. घटनेची माहिती मिळताच आमदार डॉ. अशोक उईके, नायब तहसीलदार आर. बी. बिजे, मंडळ अधिकारी प्रशांत घडीकर, तालुका कृषी अधिकारी राकेश दासरवार यांनी घटनास्थळाला भेट दिली. दरम्यान, पावसाळ्यात शेतकऱ्यांसह नागरिकांनी विशेष दक्षता घेण्याची गरज आहे. वीज पडू नये म्हणून झाडाखाली डोंगराळ भागात थांबू नये.
मुदाटीत वीज कोसळली; गजाननचा मृत्यू, मारूती बचावला
- झरी तालुक्यातील मुदाटी आणि राजनी येथेही मंगळवारी दुपारी वीज कोसळून प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला. मुदाटी येथे गजानन कोचीराम टेकाम (४२) तर राजनी येथे लिंबेश कवडू आत्राम (३०) यांचा मृत्यू झाला. मृत गजानन टेकाम आणि त्याचा चुलत भाऊ मारोती सूर्यभान टेकाम हे दोघेही शेतात सारण्या फाडत हाेते. दुपारी १.३०वाजताच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला. त्यामुळे दोघेही आडेश्यासाठी कडूनिंबाच्या झाडाखाली उभे राहिले. एकमेकांच्या विरोधी बाजूला उभे असताना झाडावर वीज कोसळली. त्यात गजानन आणि मारूती दोघेही जखमी होऊन खाली पडले. शिवारातील नागरिकांना त्यांना झरी येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. तेथे डाॅक्टरांनी गजाननला मृत घोषित केले. मारूती विजेच्या धक्क्याने प्रचंड प्रभावित झाला असून त्याच्या उपचार सुरु आहे. राजनी शिवारात लिंबेश आत्राम पाऊस सुरू झाल्याने मोहाच्या झाडाखाली थांबला होता. त्याच वेळी झाडावर वीज कोसळल्याने त्याच्या डोक्याला जबर दुखापत झाली. जागीच त्याचा मृत्यू झाला. पाटणच्या ठाणेदार संगीता हेलोंडे व सहकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी झरी ग्रामीण रुग्णालयात रवाना केला.
पोटचा जीव गेल्याने आईने फोडला हंबरडा
- एकाच ठिकाणी काम करत असलेले सर्वजण जीव वाचविण्यासाठी झाडाखाली थांबले. यामध्ये आई व मुलाचाही समावेश होता. वीज कोसळताच सर्वजण हादरून गेले. डोळ्याची पापणी हालत नाही तोच मुलगा दगावल्याचा प्रसंग घडला. शशिकला कांबळे यांचा बबलू गोविंदा कांबळे हा मुलगा होता. डोळ्यासमोरच त्याचा मृत्यू झाल्याने शशीकला यांनी हंबरडा फोडला होता.