जगण्याचे प्रश्न झाले उदंड.. मरणाचे पीक आले प्रचंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2022 10:58 PM2022-10-07T22:58:34+5:302022-10-07T22:59:16+5:30
संघर्ष करून उच्चशिक्षित झालेले तरुण अजूनही सन्मानजनक रोजगाराच्या प्रतीक्षेतच आहेत. गेल्या दहा दिवसांत झालेल्या १७ आत्महत्यांमध्ये अशा तरुणांचेही मोठे प्रमाण आहे. कौटुंबीक कलहांनी महिलांना जगणे मुश्कील केले आहे. त्यातून महिलाही जीवन संपविण्याची मनस्थितीत पोहोचल्याचे आत्महत्यांच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले तर गंभीर म्हणजे, हसत-खेळत जगण्याच्या वयातील मुलेही आत्मघात करू लागली आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : बेरोजगारी, नापिकी आणि कौटुंबीक कलहांनी जिल्ह्यात अनेकांचे जीवन उद्ध्वस्त केले आहे. अनेकांना जगणे कठीण झाले. त्यातून आलेल्या नैराश्याने आता प्रौढांसह अल्पवयीन मुलांनाही घेरले आहे. त्यामुळेच अवघ्या दहा दिवसांत १७ जणांनी आत्महत्या केल्याची गंभीर बाब पुढे आली आहे.
शेती हाच मुख्य आधार असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात कृषी जीवनच दुर्लक्षित झाले आहे. दरवर्षी होणारी शेतपिकांची नासाडी, नापिकी न्यायाच्या प्रतीक्षेतच राहात आहे. यंदाही हाताशी आलेल्या पिकांना अतिवृष्टीने गारद केले. शेतीसोबत रोजगाराचा आधार देण्यासाठी जिल्ह्यात उद्योगांची वानवा आहे. जे काही रोजगार उपलब्ध आहेत, त्यात स्थैर्य उरलेले नाही. संघर्ष करून उच्चशिक्षित झालेले तरुण अजूनही सन्मानजनक रोजगाराच्या प्रतीक्षेतच आहेत. गेल्या दहा दिवसांत झालेल्या १७ आत्महत्यांमध्ये अशा तरुणांचेही मोठे प्रमाण आहे. कौटुंबीक कलहांनी महिलांना जगणे मुश्कील केले आहे. त्यातून महिलाही जीवन संपविण्याची मनस्थितीत पोहोचल्याचे आत्महत्यांच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले तर गंभीर म्हणजे, हसत-खेळत जगण्याच्या वयातील मुलेही आत्मघात करू लागली आहेत.
औदासिन्याने ग्रासलेल्या यवतमाळ जिल्ह्याला पुन्हा जगण्याचा मार्ग दाखविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी मार्ग शोधण्याची गरज आहे तर सामाजिक संघटनांनी केवळ निवेदनांचा खेळ करण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीशील पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आयुष्यात प्रत्येकालाच संकटाला तोंड द्यावे लागते. अशा स्थितीत निराश न होता संकटाशी दोन हात करण्याची गरज आहे. आत्महत्येने प्रश्न संपत नाही तर अधिक जटिल होतात.
दोनोडा येथील इसमाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
कळंब : विहिरीत उडी घेऊन ५५ वर्षीय इसमाने आत्महत्या केली. बबन मारोतराव निनावे (रा. दोनोडा, ता. कळंब) असे मृताचे नाव आहे. दोनोडा ते खुदावंतपूर रस्त्यावरील विहिरीत उडी घेऊन त्याने आपली जीवनयात्रा संपविली. दीर्घ आजाराला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले जाते.
दत्तापूर तलावात युवकाची आत्महत्या
कळंब : दत्तापूर येथील तलावात उडी घेऊन युवकाने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. गुरुदेव वसंत टेकाम (३२,रा.डोर्ली,ता.यवतमाळ) असे त्याचे नाव आहे. एका व्यक्तीने तलावात उडी घेतल्याची माहिती मिळाल्याने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून शोध घेण्यात आला. सकाळी त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. मृत गुरुदेव हा मागील काही महिन्यापासून दत्तापूर येथे सासऱ्याकडे राहत होता. तो गवंडी काम करायचा. घरगुती वादातून त्याने तलावात उडी घेतल्याचे सांगितले जाते.
कुठे शेतकरी तर कुठे बेरोजगाराने घेतला गळफास
- २७ सप्टेंबर : झाडगाव येथील ४० वर्षीय शेतकऱ्याने, तर पुसद येथील ३९ वर्षीय बेरोजगार तरुणाने आत्महत्या केली.
- २८ सप्टेंबर : झाडगाव येथील ५३ वर्षीय इसम, यवतमाळ येथील ६३ वर्षीय वृद्ध, पारवा येथील ६५ वर्षीय वृद्ध, वांजरी येथील ३२ वर्षीय युवक, राळेगाव येथील ५३ वर्षीय इसम, घाटंजी येथील ६५ वर्षीय महिला, वणी येथील ३२ वर्षीय मजूर.
- ३० सप्टेंबर : सोनखास येथील शेतकरी व बोरी इचोड येथील शेतकरी.
- १ ऑक्टोबर : गुंज येथील ४६ वर्षीय पोलीस पाटील.
- २ ऑक्टोबर : यवतमाळ येथील ३५ वर्षीय इसम.
- ३ ऑक्टोबर : सिंगद येथील ४० वर्षीय शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे पुढे आले.
- ५ ऑक्टोबर : आमकिन्ही येथील ५० वर्षीय इसम.
- ६ ऑक्टोबर : रोजी जिल्ह्यातील दोनोडा तसेच दत्तापूर येथील दोन शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले.
भ्रमाचा आजार, डिप्रेशन, भावनांना आवर न घालता येणे या प्रमुख बाबींसह व्यसनाधीनतेमुळे व्यक्ती आत्महत्येकडे वळतो. अशा परिस्थितीत परिवारातील व्यक्तींनी मानसोपचार तज्ज्ञांकडे घेऊन जाणे गरजेचे असते. मात्र, अशी व्यक्ती मानसोपचार तज्ज्ञांकडे जात नाही. सध्याच्या स्थितीत मानसिक आरोग्य सप्ताह सुरू आहे. गावोगावी याची जाणीव जागृती सुरू आहे.
- डाॅ. श्रीकांत मेश्राम,
मानसोपचार तज्ज्ञ, यवतमाळ
मानसिक संतुलन बिघडल्यानंतर नको नको ते विचार डोक्यात येतात. अशा परिस्थिती टोकाचा निर्णय घेतल्या जाण्याचा धोका असतो. त्यातून सावरण्यासाठी दररोज व्यायाम केला पाहिजे. चांगला आहार घेतला पाहिजे. योगसाधना करावी. व्यसनाधीनतेपासून दूर जावे. यामुळे मानसिक स्वास्थ्य जपता येईल.
- डाॅ. पीयूष बरलोटा,
मानसोपचार तज्ज्ञ, यवतमाळ