प्राध्यापकाने विष प्राशन करून संपविली जीवनयात्रा
By विशाल सोनटक्के | Updated: May 21, 2024 15:30 IST2024-05-21T15:29:42+5:302024-05-21T15:30:43+5:30
Yavatmal : दहा वर्षांपासून पगार नाही, त्यातच नापिकीने केली होती आर्थिक कोंडी

The professor ended his life by taking poison
यवतमाळ : महाविद्यालयात दररोज हजेरी लावूनही दहा वर्षांपासून पगार मिळत नव्हता. त्यामुळे चार एकर शेतीत त्यांनी लक्ष घातले. मात्र, तेथेही पदरी निराशा पडली. सततच्या नापिकीमुळे आर्थिक कोंडीचा सामना करावा लागला. या स्थितीत पदवीचे शिक्षण घेत असलेल्या आपल्या मुलीचे लग्न व एकुलत्या एक मुलाचे शिक्षण कसे करायचे? याची चिंता त्यांना सतावत होती. यातूनच पुसद येथील एका प्राध्यापकाने स्वतःच्या शेतात विष प्राशन करून जीवनयात्रा संपविली. ही हृदयद्रावक घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली. या घटनेमुळे शैक्षणिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
प्रा. डॉ. अनिल भावनराव चव्हाण (५६, रा. जयनगर, पुसद) असे आत्महत्या केलेल्या प्राध्यापकाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, स्थानिक जनता शिक्षण प्रसारक मंडळाच्या विनानुदानित शारीरिक शिक्षण (बीपीएड) महाविद्यालयात प्रा. डॉ. अनिल चव्हाण काम करतात. मात्र, २०१३-१४ पासून विद्यार्थ्यांची संख्या घटत गेली. त्यामुळे या महाविद्यालयासह जिल्ह्यातील बहुतांश महाविद्यालये नावालाच उरली आहेत. त्यामुळे मागील दहा वर्षांपासून चव्हाण यांना पगार मिळालेला नाही. त्यांच्याकडे असलेल्या चार एकर शेतीवरच कुटुंबाची गुजराण होत होती. मात्र, सततच्या नापिकीमुळे ते नेहमी आर्थिक विवंचनेत असायचे. यातूनच त्यांच्याकडे विविध कार्यकारी सोसायटी व इतर खासगी संस्थांचे कर्ज झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. पदवीचे शिक्षण घेत असलेल्या आपल्या मुलीचे लग्न व एकुलत्या एक मुलाचे शिक्षण कसे करायचे? याची चिंता त्यांना नेहमी सतावत असे, अशातच आजारानेही त्यांचा पिच्छा पुरविला होता. यामुळे जगणे असह्य झाल्याने प्रा. डॉ. अनिल चव्हाण यांनी सोमवारी सकाळी १०:०० वाजताच्या सुमारास वरुड शिवारातील स्वतःच्या शेतात जाऊन विष प्राशन केले. त्यांच्या पश्चात वडील भावनराव, आई शांताबाई, पत्नी शोभाताई, मुलगी वैष्णवी (२२), मुलगा लुकेश (१६), चार बहिणी असा मोठा आप्त परिवार आहे. अत्यंत मनमिळाऊ व हजरजबाबी स्वभावाच्या प्रा. डॉ. अनिल चव्हाण यांनी अचानक आपली जीवनयात्रा संपविल्याने त्यांच्या कुटुंबीयांसह शहरवासीयांतून हळहळ व्यक्त होत आहे. पुसदच्या मोक्षधामात त्यांच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
विष घेतल्यानंतर मोबाइलवरून दिली माहिती
प्रा. डॉ. अनिल चव्हाण यांनी शेतात विष घेतल्यानंतर त्यांनी ही माहिती स्वतःच मोबाइलवरून त्यांच्या नागपूर येथील जावयास दिली. त्यानंतर ही वार्ता मिळताच कुटुंबीयांनी शेताकडे धाव घेतली. प्रा. चव्हाण यांना तातडीने शहरातील एका खासगी दवाखान्यात उपचारार्थ दाखल केले. मात्र, तोपर्यंत बराच उशीर झाला होता. अखेर डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. पुसदच्या उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्या मृतदेहाचे विच्छेदन करण्यात आले.