खाईत दडलेल्या उकंडा पोडमध्ये शिक्षणाचा डोंगराएवढा प्रश्न; १६ विद्यार्थ्यांनी जायचे कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2022 04:23 PM2022-11-12T16:23:24+5:302022-11-12T16:46:25+5:30

गावाच्या रस्त्यात दोन किमीचा घाट अन् त्यात बिबट्याचे भय

the question of education in Uganda pod village located in the valley; Where should the students go? | खाईत दडलेल्या उकंडा पोडमध्ये शिक्षणाचा डोंगराएवढा प्रश्न; १६ विद्यार्थ्यांनी जायचे कुठे?

खाईत दडलेल्या उकंडा पोडमध्ये शिक्षणाचा डोंगराएवढा प्रश्न; १६ विद्यार्थ्यांनी जायचे कुठे?

googlenewsNext

अविनाश साबापुरे 

यवतमाळ : या गावाचे नाव उकंडा पोड.... . उकंडा म्हणजे केरकचरा साठविण्याची गावाबाहेरची जागा. नावाप्रमाणेच व्यवस्थेने या गावाचाही कचरा करून टाकलेला आहे. यवतमाळ शहराच्या काठावर असूनही एका जंगली खाईत वसलेल्या या दुर्लक्षित गावात विकासाची गंगा पोहोचवू शकणारी चिटुकली शाळा आहे. पण गावच छोटे असल्याने शाळेतील विद्यार्थ्यांची संख्याही छोटीच आहे. अन् या छोट्या संख्येचे निमित्त करून प्रशासनाने मोठे संकट आणले आहे.

ते संकट आहे शाळा बंदीचे. कमी पटाच्या नावाखाली ही शाळा बंद झाली तर येथील १६ गरीब विद्यार्थ्यांचा सामना जंगलातल्या खऱ्या हिंस्र प्राण्याशी होणार आहे. कारण त्यांचे समायोजन झाले तर दोन किलोमीटरचा जंगल व्याप्त डोंगर ओलांडण्याशिवाय गत्यंतर नाही. प्रशासनाने २० पेक्षा कमी पटाच्या शाळा बंद करण्याच्या हालचाली चालविल्या आहेत. त्यात जिल्ह्यातील ३५० शाळांचा समावेश असून उकंडा पोडची शाळाही त्यात आहे. तब्बल दोन किलोमीटर किर्र जंगलातून जाणारा घाट उतरल्यावरच या गावाचे

दर्शन होते. चारही बाजूंनी उंच डोंगर असलेल्या या गावात झोपडीवजा घरे याशिवाय दुसऱ्या सुविधा नाहीत. अवघी ३०० लोकसंख्या आहे. पहिली ते पाचव्या वर्गात जाणारी १६ मुले-मुली आहेत. पूर्वी मोहा गट ग्रामपंचायतीत समाविष्ट असलेले उकंडा पोड आता मोहासोबतच यवतमाळ नगरपालिकेत विलीन झाले आहे. पण यवतमाळ शहरातील ८० टक्के नागरिकांना उकंडा पोड नावाचे गाव आपल्या शेजारी असल्याची खबरबात नाही.

या गावात उतरल्यावर बाहेरच्या दुनियेपासून पूर्णत: संपर्क तुटतो. गावात केवळ २०-२५ जणांकडे थोडीबहुत शेती आहे. त्यातील अर्धी शेती डोंगरात असल्याने पडित आहे. आता येथील शाळा कमी पटामुळे बंद (किंवा प्रशासनाच्या भाषेत समायोजित) केल्यास येथील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना परगावात जाताना प्रचंड यातना भोगाव्या लागणार आहेत.

विद्यार्थ्यांचा निरासग प्रश्न

इशानी रवी देवकर (पहिला वर्ग), मोरेश्वर केशव शिवणकर (पाचवा वर्ग). शिवा गजानन कुमरे (दुसरा वर्ग) साहील सुरेश डेबूर (दुसरा वर्ग), अंजना श्रीराम मादापुरे (पहिला वर्ग). विराट रवी देवकर (पाचवा वर्ग) हे उकंडा पोडचे विद्यार्थी मंगळवारी शाळेला सुटी असल्याने गावात खेळताना आढळले. त्यांना दुसऱ्या गावात शाळा गेली तर तुम्ही जाल का, असे विचारताच त्यांचे निरागस उत्तर नवा प्रश्न घेऊन आले... कितीक दूर अशीन थे शाळा?

आमच्या गावात शाळा सुरु राहणे अत्यंत आवश्यक आहे. शाळा बंद झाली तर दुसरी शाळाच नाही अन् यवतमाळच्या किवा मोहाच्या शाळेत पाठविण्याची पालकांची परिस्थिती नाही. 

- बजरंग घोटेकर, गावकरी

गावाच्या चारही बाजूने असलेल्या जंगलात बिबटे, वाघ, हरिण, रानडुक्कर, रोही आहेत. अशा मार्गाने दररोज मुले दुसऱ्या गावातील शाळेत कसे जाणार? 

- राजू बोरकर, गावकरी

शासनाने या गावातील परिस्थितीचा विचार करावा. ही शाळा बंद झाली तर आमचे विद्यार्थी दुसऱ्या गावात जाणे अशक्य आहे. शाळेत जाता-येताना मलाच तर बिबट्या, रोही दर्शन देत असतात. मरा मुलांच्या सुरक्षेचे काय?

- अविनाश बनसोड, मुख्याध्यापक, उकंडा पोड

Web Title: the question of education in Uganda pod village located in the valley; Where should the students go?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.