नातेवाईकानेच केला पोलिस पाटलाचा खून; चहा पिण्यासाठी घरात नेऊन केले चाकूने सपासप वार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2023 03:12 PM2023-11-11T15:12:25+5:302023-11-11T15:12:34+5:30

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी झालेल्या खून प्रकाराने गावात खळबळ

The relative killed the police patil; Took him home to drink tea and stabbed with a knife | नातेवाईकानेच केला पोलिस पाटलाचा खून; चहा पिण्यासाठी घरात नेऊन केले चाकूने सपासप वार

नातेवाईकानेच केला पोलिस पाटलाचा खून; चहा पिण्यासाठी घरात नेऊन केले चाकूने सपासप वार

कळंब (यवतमाळ) : पोलिस आणि नागरिकांमधील महत्त्वाचा दुवा असलेल्या पोलिस पाटलाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. ही घटना शुक्रवारी सकाळी तालुक्यातील खुदावंतपूर येथे घडली. राजेश कोल्हे (५३) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी विजय रामभाऊ खुडसंगे (५९) याला कळंब पोलिसांनी अटक केली.

पोलिस पाटील संघटनेचे सहसचिव असलेले राजेश कोल्हे व आरोपी विजय खुडसंगे नातेवाईक आहेत. मारेकरी विजय व त्यांच्या पत्नीमध्ये नेहमी लहानसहान गोष्टीवरून वाद व्हायचा. त्यांच्यात समेट घडविण्याचा प्रयत्न राजेश कोल्हे नेहमी करायचे. ही मध्यस्थी विजय खुडसंगे यांना आवडत नव्हती. याचा त्याच्या मनात राग होता. यातच शुक्रवारी राजेशचा मुलगा अनिकेत कोल्हे हा घरासमोर मोटारसायकल धूत होता. तेथे राजेश कोल्हे व प्रफुल्ल भोयर उभे होते.

मृताच्या मुलाचे नात्याने चुलत आतेमामा लागणारा आरोपी विजय खुडसंगे याने राजेश कोल्हे यांना घरी चहा पिण्यासाठी नेले. आम्हा पती-पत्नीच्या भांडणात मध्यस्थी का करतो, असे म्हणत तेथेच त्याच्यावर चाकूने वार केले. हा प्रकार मृताचा मुलगा अनिकेत कोल्हे (२२) याच्या लक्षात येताच त्याने वडिलांना वाचविण्याचा प्रयत्न केला. यामध्ये अनिकेतलाही उजव्या हाताला घाव बसला. कोल्हे यांना तातडीने कळंब येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

याप्रकरणी मृताचा मुलगा अनिकेत राजेश कोल्हे यांच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास ठाणेदार दीपमाला भेंडे करीत आहेत. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी झालेल्या खून प्रकाराने गावात खळबळ निर्माण झाली आहे.

Web Title: The relative killed the police patil; Took him home to drink tea and stabbed with a knife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.