गरिबांनी रचला पाया, तू का अडविला कळस ! प्रधानमंत्री आवास योजनेतील दुसरा हप्ता लटकला
By अविनाश साबापुरे | Published: April 16, 2024 05:20 PM2024-04-16T17:20:14+5:302024-04-16T17:21:16+5:30
जिल्ह्यातील २५ हजार लाभार्थ्यांना प्रतीक्षा.
अविनाश साबापुरे, यवतमाळ : पै-पै गोळा करून दोन घासाची सोय करणाऱ्यांसाठी घर बांधणे म्हणजे महाकठीण काम असते. त्यांच्यासाठी शासनाची घरकुल योजना उपयुक्त ठरते. मात्र योजनेतून मंजुरी मिळविताना व नंतर निधी मिळविताना या गरिबांचा जीव मेटाकुटीला येतो. मोदी आवास योजनेतून पहिला हप्ता मिळवून घराचा पाया बांधणाऱ्या गरिबांना आता दुसरा हप्ता मिळालेला नाही. तो मिळाल्याशिवाय भिंती आणि छत होणे अशक्य झाले आहे.
घरकुलाचा पायवा घेऊन बसलेल्या तब्बल २५ हजार ५५४ लाभार्थ्यांना अद्याप दुसरा हप्ता मिळालेला नाही. निधी येऊनही दुसरा हप्ता का ‘रिलिज’ केला जात नाही, असा प्रश्न लाभार्थी उपस्थित करीत आहेत. मोदी आवास योजनेतून ग्रामीण क्षेत्रात घरकुलासाठी १ लाख २० हजारांची रक्कम लाभार्थ्यांना टप्प्या-टप्प्याने दिली जाते. यात घरकुल मंजूर झाल्यावर पहिला हप्ता १५ हजारांचा मिळतो. पायवा पूर्ण झाल्यावर ४५ हजारांचा दुसरा हप्ता आणि लिंटर लेवलपर्यंत काम झाल्यावर तिसरा ४० हजारांचा हप्ता दिला जातो. संपूर्ण घरकुल पूर्ण झाल्यावर उर्वरित २० हजार रुपये दिले जातात. तर प्रधानमंत्री आवास योजनेत दुसरा हप्ता ७० हजारांचा मिळतो.
दुसऱ्या हप्त्याचे पैसे मिळतील या आशेवर अनेकांनी हातउसने कर्ज घेऊन पायवा बांधून घेतला. परंतु, अद्याप प्रशासनाकडून दुसऱ्या हप्त्याचे पैसे सोडण्यात आलेले नाहीत. त्यामुळे कर्जबाजारी झालेल्या गरीब लाभार्थ्यांना आपल्या घरकुलाचे स्वप्न चक्काचूर होण्यासोबतच कर्ज चुकते करण्याचीही काळजी भेडसावत आहे. ‘ज्ञानदेवे रचियेला पाया, तुका झालासे कळस’ हा अभंग ठाऊक असलेल्या लाभार्थ्यांना आता ‘गरिबांनी रचियेला पाया, तू का अडविला कळस?’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.
दुसऱ्या हप्त्याच्या प्रतीक्षेतील लाभार्थी-
तालुका : मंजूर घरकूल : दुसरा हप्ता नाही
आर्णी : ९६३ : ८४८
बाभूळगाव : १७८८ : १५८१
दारव्हा : २१८८ : २१७५
दिग्रस : ८९६ : ८५४
घाटंजी : १९१२ : १३३६
कळंब : १४२४ : ११६८
केळापूर : १७८७ : १३५२
महागाव : ९२० : ८२१
मारेगाव : १६७७ : १४३१
नेर : १६७१ : १५९०
पुसद : १८९१ : १५७५
राळेगाव : २६२९ : २१७९
उमरखेड : ३४६६ : ३०२४
वणी : २७१४ : २५११
यवतमाळ : २३०८ : १७२४
झरीजामणी : १७६५ : १३८५
प्रशासन काय म्हणते...
याबाबत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या म्हणण्यानुसार, जिल्ह्यात मोदी आवास योजनेत एकंदर २९ हजार ९९९ घरकुलांना मंजुरी देण्यात आलेली आहे. २८ मार्च रोजी निधीचा पहिला हप्ता रिलिज केला गेला. त्यातही नमुना आठ न जोडणारे, चुकीचे बँक खाते देणारे, राष्ट्रीयीकृत बँकेचे खाते न देणारे अशा ३४२३ लाभार्थ्यांचा पहिला हप्ताही सोडण्यात आलेला नाही. तर दुसऱ्या हप्त्याचा निधी पायव्याचे बांधकाम झाल्यावरच रिलिज केला जाणार आहे. ही प्रक्रिया आता सुरू झाली आहे. आतापर्यंत या योजनेतून २४ घरकुलांचेच बांधकाम पूर्ण झाले आहे. तर २९ हजार ९७५ बांधकामे सुरु आहेत.