एका गलितगात्र कुटुंबासाठी जेव्हा धावून जातो ‘समाज’..!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2023 01:58 PM2023-07-01T13:58:43+5:302023-07-01T14:01:00+5:30
संकल्प फाउंडेशनची धडपड : यवतमाळातील गरीब परिवाराला दिला आधार, उपचार अन् दिलासा
यवतमाळ : समाज नुसता माणसांच्या गर्दीमुळे बनत नाही, एका जातीची माणसे एकत्र आली म्हणूनही बनत नाही. मग समाज म्हणजे नेमके काय असते? ही घटना वाचा अन् समजून घ्या... पत्नीच्या पायाला पोलिओ, त्यातच पडल्याने ती अंथरुणाला खिळली. पती मानसिक आजाराचा बळी. पदरात साडेचार वर्षांची चिमुकली. वृद्ध सासऱ्याच्या पायाला गँगरीन, सासू थकलेली. घरात दोन घासांचीही सोय नाही. अशा कुटुंबाला आर्थिक, मानसिक आधार देत यवतमाळच्या लोकांनी नकारात्मकतेच्या दारातून पुन्हा सकारात्मकतेच्या उजेडाकडे आणले. ‘माणसाने माणसाशी माणसासम वागणे’ हे सूत्र स्वीकारल्यावरच ‘समाज’ ही संकल्पना जिवंत होते. त्याचे मूर्तिमंत उदाहरण येथील संकल्प फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी सर्वांपुढे ठेवले.
आता नेमका प्रकार जाणून घेऊया... यवतमाळातील एका मध्यमवर्गीय कुटुंबाची ही कहाणी आहे. ३० वर्षीय कमल या पोलिओग्रस्त महिलेचे पती मानसिक रोगी आहेत. त्यांच्या पदरी साडेचार वर्षांची सुंदर स्वराली. वृद्ध सासऱ्यांच्या पायाला गँगरीन, सासू म्हातारी. घरात अठराविश्व दारिद्र्य. कुणाच्याच हाताला काम नाही. पायाला पोलिओ असूनही कमल कशीबशी मेस चालवायची, पण फेब्रुवारीत ती पोलिओ असलेल्या पायावर पडली आणि त्या पायावर सरकारी दवाखान्यात दोन शस्त्रक्रिया झाल्या. आता ती अंथरुणाला खिळली.
ओम सोसायटीतील एका सदगृहस्थाकडे हे कुटुंब भाड्याच्या खोलीत राहते. त्यांची परिस्थिती पाहून ते या कुटुंबाकडून भाडेही घेत नाहीत, पण आता दोन घासांचे काय? जगायचे कसे? जगायचे की सर्वांनी टोकाचा निर्णय घ्यायचा? अशा नकारात्मक अवस्थेत हे कुटुंब पोहोचले, पण कमलला तेवढ्यात सद्बुद्धी सुचली अन् तिने संकल्प फाउंडेशनला फोन करून आपली परिस्थिती कळवली अन् सुरू झाला माणुसकीच्या मदतीचा प्रवाह....
‘संकल्प’चे कार्यकर्ते पत्ता शोधत या कुटुंबाकडे पोहोचले, तेव्हा तेथे अन्नाचा कणसुद्धा नव्हता. लगेच सिलिंडर, तेल, डाळ, तांदूळ, गहू व किराणा देऊन या कुटुंबाला आधार देण्यात आला; परंतु नकारात्मकतेतून त्यांना बाहेर काढण्यासाठी अनेक गोष्टी करणे आवश्यक होते. त्यासाठी संकल्प फाउंडेशनने चिमुकल्या स्वरालीचा दहावीपर्यंतचा सर्व शैक्षणिक खर्च करण्याचा निर्धार केला. त्यासाठी ठाणेदार मनोज केदारे हे पालकत्व स्वीकारणार आहेत. त्याशिवाय, अनिल गायकवाड यांच्या मदतीने बालसंगोपन योजनेतून स्वरालीला २२५० रुपयांचा लाभ मिळणार आहे.
अपंग योजनेतून कमललासुद्धा लाभ मिळणार आहे. ह्या सर्व प्रक्रिया युद्धस्तरावर संकल्प फाउंडेशनच्या वतीने सुरू आहेत. अंथरुणाला खिळलेल्या कमलबाबत संकल्प फाउंडेशनच्या वतीने शासकीय रुग्णालयाचे डॉ. जय राठोड यांच्याशी चर्चा करण्यात आली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आल्यानंतर डॉ. जय राठोड यांनी कमलच्या उपचाराला सुरुवात केली. सर्व रिपोर्ट झाल्यानंतर कमलवर यशस्वी शस्त्रक्रिया केली. त्याकरिता संकल्प फाउंडेशनचे उदय सरतापे, आकाश भारती यांनी रक्तदान केले. दरम्यानच्या काळात संकल्प फाउंडेशनची टीम रोज या कुटुंबाकडे जाऊन आधार देत होते. रवी ठाकूर यांनी चिमुकल्या स्वरालीला चॉकलेट बिस्कीट, खेळणी, चप्पल अशा विविध वस्तू दिल्या. मनोज तामगाडगे यांनी कमलला साडी व स्वरालीला फ्रॉक देऊन आपला वाढदिवस साजरा केला. हे कुटुंब हळूहळू सकारात्मकतेकडे वळले.
कमल व तिच्या सासऱ्यांना दवाखान्यातून सुट्टी झाली; परंतु अचानक सासऱ्यांची प्रकृती खालावली आणि त्यांनी प्राण सोडला, पण याही प्रसंगात संकल्प फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी साथ सोडली नाही. शवपेटी, शववाहिनी व इतर अंत्यविधी साहित्याची गोळाबेरीज करून तसेच कमल यांच्या मुलीच्या मुलाला आणून अंत्यसंस्कार केले. आता या कुटुंबाचे संपूर्ण पुनर्वसन होईपर्यंत प्रयत्न सुरूच राहतील, असा या फाउंडेशनने ‘संकल्प’ केला आहे. या संपूर्ण धावपळीत संकल्प फाउंडेशनचे अध्यक्ष प्रलय टिप्रमवार, रवी माहूरकर, रवी ठाकूर, मनोज तामगाडगे, अरुण सरागे, रामराव मोरे, राजेंद्र गावंडे, विनोद दोंदल, नीलेश ठोंबरे, रवी कडू, प्रशांत बोराडे, महादेव काचोरे व इतर सदस्यांनी मेहनत घेतली.
सामाजिक हितासाठी संकल्पचा प्रत्येक कार्यकर्ता समर्पक भावनेने कार्य करीत आहे. या कुटुंबाला आधार मिळावा म्हणून आमचे प्रयत्न सुरूच राहणार आहेत.
- प्रलय टिप्रमवार, अध्यक्ष, संकल्प फाउंडेशन.