'तालुका तिथे हेलिपॅड' योजनाच अडकली; इमर्जन्सी लँडिंग करण्याकरिता जागाच नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 06:14 PM2024-07-23T18:14:37+5:302024-07-23T18:18:57+5:30

Yavatmal : दोन वर्षांत जिल्हास्तरावर एकही प्रस्ताव नाही

The 'taluka there helipad' plan stuck; There is no land for emergency landing | 'तालुका तिथे हेलिपॅड' योजनाच अडकली; इमर्जन्सी लँडिंग करण्याकरिता जागाच नाही

The 'taluka there helipad' plan stuck; There is no land for emergency landing

संजय भगत
लोकमत न्यूज नेटवर्क 
महागाव :
शासनाच्या हेलिपॅड धोरणाप्रमाणे प्रत्येक तालुक्यात कायमस्वरूपी हेलिपॅड करण्यासाठी नियोजन करून जागा निश्चित करण्याबाबत संचालक विमान चालन संचालनालय यांच्या १० फेब्रुवारी २०२२ च्या पत्रानुसार जिल्ह्यातील सर्व तालुका मुख्यालय ठिकाणी तहसीलदार यांना जागा निश्चित करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांनी पत्र पाठवले होते. दोन वर्षांत जिल्हाभरातून एकही प्रस्ताव जिल्हास्तरावर दाखल झाला नाही. 'तालुका तिथे हेलिपॅड' योजनाच अडकली आहे.


महागाव तालुक्यातील आनंदनगर येथे पुराच्या पाण्यामध्ये अनेक कुटुंबे अडकून पडली होते. या घटनेला २४ जुलै रोजी एक वर्ष होत आहे. नागरिकांच्या बचाव कार्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली. मात्र, इमर्जन्सी लैंडिंग करण्यासाठी हेलिपॅड नसल्यामुळे ऐनवेळेवर खडका येथे महामार्गावर हेलिकॉप्टर लैंड करण्यात आले. पायलटला लोकेशन मिळत नसल्यामुळे बराच वेळ मदतकार्यामध्ये अडथळा निर्माण झाला होता. त्यानंतरही या धोरणात्मक निर्णयाची अजूनही जिल्हा प्रशासनाने दखल घेतलेली नाही. अतिवृष्टीमुळे पूर बाधित क्षेत्रात जीवितहानी टाळण्यासाठी इमर्जन्सी लँडिंग करण्याकरिता तालुका तेथे कायमस्वरूपी हेलिपॅड निर्माण करण्याकरिता जागेची निश्चिती करण्याचे निर्देश तहसीलदार यांना देण्यात आले होते. या प्रस्तावाबाबत जिल्हा प्रशासनाने पाठपुरावा केला नसल्यामुळे जिल्हाभरातून तहसीलदारांनी प्रस्तावच दाखल केले नाही.


नागरी विमान महासंचालनालयाचे नियम लक्षात घेऊन तयार करण्यात आलेल्या परिशिष्ट पत्रात महाराष्ट्र शासनाचे शासन निर्णय २५ जानेवारी २०१८ राज्याचे हेलिपॅडबाबतचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाच्या प्रत्येक तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी कायमस्वरूपी हेलिपॅड करण्यासाठी नियोजन जागा निश्चित करून त्याप्रमाणे अहवाल संचालक विमान चालन संचालनालय, मुंबई यांच्यामार्फत शासनास सादर करण्याबाबत निर्देश देण्यात आलेले होते.


आता तरी जाग येणार का?
गेल्या तीन दिवसांपासून तालुक्यामध्ये सतत पाऊस सुरू आहे. विशेष करून आनंदनगर भागामध्ये वर्षभरापूर्वी पूरस्थितीमुळे जीवितहानीचा प्रसंग ओढवला होता. हिवरा संगम भागामध्ये प्रचंड पाऊस झाला आहे. लागूनच नद्यांचा संगम असल्यामुळे नदीला आलेल्या पुराची नेहमी भीती असते. आता तरी प्रशासन तालुका तिथे हेलिकॉप्टरसाठी हेलिपॅड तयार करण्याला प्राधान्य देणार आहे का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

 

Web Title: The 'taluka there helipad' plan stuck; There is no land for emergency landing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.