कापड व्यापाऱ्याने पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही घातला लाखोंचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2022 05:00 AM2022-05-30T05:00:00+5:302022-05-30T05:00:21+5:30
पोलीस नियंत्रण कक्षात असलेल्या सहायक निरीक्षकाने या व्यापाऱ्यासोबत बालाजी दर्शन केले. या दर्शनाला जाण्यापूर्वी चार लाख व दर्शनावरून आल्यानंतर पाच लाख असे नऊ लाख रुपये दिले. अतिशय प्रेमळ, मनमिळावू व अधिकाऱ्यांची आज्ञा झेलणारा व्यापारी असल्याने त्याच्यावर मोठा विश्वास होता. यातूनच सहायक निरीक्षकाने जमविलेल्या मायेतील पैसे त्या व्यापाऱ्याला दिले. याहीपेक्षा अधिक सख्य हायवे ट्रॅपमध्ये असलेल्या सहायक निरीक्षकासोबत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरातील मुख्य बाजारपेठेत प्रसिद्ध असे साडी सेंटर चालविणारा व्यापारी अचानक परिवारासह गायब झाला आहे. याला आता एक महिना होत आहे. या व्यापाऱ्याने क्रिकेटच्या सट्ट्यात मोठा पैसा गुंतविला होता. त्यातून तो बरबाद झाला. मात्र त्याने गाव सोडण्यापूर्वी आपल्या अनेक मित्रांकडून कर्जाऊ रकमा घेतल्या. त्यात पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. वरकमाईमुळे गब्बर बनलेले हे अधिकारी, कर्मचारी अशा व्यापाऱ्याच्या माध्यमातून गुंतवणुकीचा प्रयत्न करतात.
पोलीस नियंत्रण कक्षात असलेल्या सहायक निरीक्षकाने या व्यापाऱ्यासोबत बालाजी दर्शन केले. या दर्शनाला जाण्यापूर्वी चार लाख व दर्शनावरून आल्यानंतर पाच लाख असे नऊ लाख रुपये दिले. अतिशय प्रेमळ, मनमिळावू व अधिकाऱ्यांची आज्ञा झेलणारा व्यापारी असल्याने त्याच्यावर मोठा विश्वास होता. यातूनच सहायक निरीक्षकाने जमविलेल्या मायेतील पैसे त्या व्यापाऱ्याला दिले. याहीपेक्षा अधिक सख्य हायवे ट्रॅपमध्ये असलेल्या सहायक निरीक्षकासोबत होते. मंडलने सगळ्यांनाच बंडल देऊन पैसा गोळा केला. ट्रॅपमध्ये असलेल्या अधिकाऱ्याने जवळपास आठ लाख रुपये त्या व्यापाऱ्याला दिले. पोलीस मुख्यालयात असलेल्या कर्मचाऱ्यानेही २५ लाख एवढी रक्कम या व्यापाऱ्याला दिली.
यासोबतच या व्यापाऱ्याने गाव सोडण्याअगोदर शहरातील एका दबंग कुटुंबातील दोन भाऊ व एका पुतण्याला ५० लाखांना गंडविले आहे.
अवैध मार्गाने आलेला पैसा हातचा निघून गेला. याची खंत पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना आहे. मात्र कायदेशीर मार्गाने ते काहीच करू शकत नाही. लाखो रुपयांचा व्यवहार त्या व्यापाऱ्यासोबत झाला. पोलिसांची अवैध धंद्यांची सलगी नवीन नाही. साडी व्यावसायिकाच्या माध्यमातून त्यांनी क्रिकेट सट्ट्यासह इतरही अवैध व्यवसायात गुंतवणूक केली.
चोरीचा मामला अन् आवाजच दबला
- एक प्रकारची ही सावकारी बिनबोभाटपणे सुरू होती. आता ज्याच्या भरवशावर गुंतवणूक केली, तोच गायब झाला आहे. दोन्ही अधिकाऱ्यांनी सोईचे पोस्टिंग मिळविण्यासाठी हा पैसा गुंतविला होता. चोरीचा मामला असल्याने पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना आवाज दाबण्याशिवाय पर्याय नाही. मात्र याची चर्चा पोलीस वर्तुळात चांगलीच रंगत आहे.