पोलिसांच्या मोटर विभागात शिरला चोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2022 05:00 AM2022-06-01T05:00:00+5:302022-06-01T05:00:15+5:30

मोटर वाहन विभागातील चोरीचे सत्र २३ नोव्हेंबर २०२१ पासून सुरू असल्याचे तक्रारीत नमूद आहे. महामहीम राज्यपाल जिल्हा दौऱ्यावर असताना वाहनांचा ताफा तयार करण्यात आला. त्यावेळी आलेल्या वाहनांच्या बॅटऱ्या लंपास झाल्या. यामध्ये एमएच-२९-एन-९०८८, ९०९५, ९५१७, ९६३८, एमएच-३७ए-४१६७, एमएच-२९-९१३० या वाहनांच्या बॅटरीज चोरीस गेल्या आहेत.

The thief broke into the police's motor department | पोलिसांच्या मोटर विभागात शिरला चोर

पोलिसांच्या मोटर विभागात शिरला चोर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : चोरट्यांनी आता कुठलीही जागा सुरक्षित ठेवलेली नाही. पोलीस मुख्यालय हे जिल्हा पोलीस दलाचा गड मानला जातो. त्या ठिकाणी असलेल्या मोटर वाहन विभागात चोरट्यांनी धुडगूस घातला. तब्बल सात वाहनांच्या ५७ हजार रुपये किमतीच्या बॅटऱ्या चोरट्याने लंपास केल्या. 
मोटर वाहन विभागाचे प्रभारी पोलीस निरीक्षक संजय पवार यांनी मंगळवारी या चोरीच्या घटनेची अवधूतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मोटर वाहन विभागातील चोरीचे सत्र २३ नोव्हेंबर २०२१ पासून सुरू असल्याचे तक्रारीत नमूद आहे. महामहीम राज्यपाल जिल्हा दौऱ्यावर असताना वाहनांचा ताफा तयार करण्यात आला. 
त्यावेळी आलेल्या वाहनांच्या बॅटऱ्या लंपास झाल्या. यामध्ये एमएच-२९-एन-९०८८, ९०९५, ९५१७, ९६३८, एमएच-३७ए-४१६७, एमएच-२९-९१३० या वाहनांच्या बॅटरीज चोरीस गेल्या आहेत. 
चोरटे चोख पोलीस बंदोबस्त असणाऱ्या पोलीस मुख्यालयात वारंवार शिरुन तेथे चोरीचा डाव साधतात. आतापर्यंत अनेक वेळा पोलीस मुख्यालयात चोरी झाली आहे. ज्या ठिकाणी जिल्हा पोलीस दलाचा शस्त्रागार आहे, तीच जागा सुरक्षित राहिलेली नाही. यावरून पोलिसांचे चोरट्यांवरील जरब संपुष्टात आल्याचे दिसून येते आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेवून उपाययोजना कराव्यात. 

मुख्यालयातील चोरीचे गुन्हे अनडिटेक्ट
- आजतागायत मुख्यालयात झालेल्या चोरीचा एकही गुन्हा उघडकीस आलेला नाही. पोलीस मुख्यालय अवधूतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते. त्यामुळे गुन्हे तपास करण्याची जबाबदारी त्यांची आहे. असे असले तरी यवतमाळ उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे शासकीय निवासस्थानही याच ठिकाणी आहे. 
- त्यानंतरही चोरट्यांचा शोध घेतला जात नाही. ही बाब अतिशय शरमेची आहे; मात्र याचे सोयरसूतक स्थानिक पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना दिसत नाही. स्वत:च्या मुख्यालयाची सुरक्षा पोलीस करू शकत नाही, असाच संदेश यातून जनमाणसात जात आहे. त्यामुळे यापुढे या परिसरात अशा घटना घडणार नाहीत, यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची गरज व्यक्त होत  आहे. 

 

Web Title: The thief broke into the police's motor department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.