चोरट्यांचा डोळा आता बॅगवर, दोन घटनांत चार लाख लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2022 05:00 AM2022-03-18T05:00:00+5:302022-03-18T05:00:16+5:30
पुष्पा प्रभुदास तांडा (वय ६०, रा. छत्रपतीनगर, नेर) ही महिला मंगळवारी बसमधून नेरकडे जात होती. तिच्यासोबत एक महिला प्रवासी बसली. तिने गर्दीचा फायदा घेऊन ३५ हजार रुपये रोख व सोन्याचे दागिने असलेली बॅग हळूच काढून घेतली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पुष्पा तांडा यांनी शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : यवतमाळ बसस्थानकावरून नेरकडे जाण्यासाठी निघालेल्या महिलेची बॅग लंपास करीत २ लाख २१ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. तर दुसऱ्या घटनेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वसाहतीतून १ लाख ६५ हजारांची बॅग लांबविली. याशिवाय जिल्ह्यात सातत्याने चोरीच्या घटना घडत आहेत.
पुष्पा प्रभुदास तांडा (वय ६०, रा. छत्रपतीनगर, नेर) ही महिला मंगळवारी बसमधून नेरकडे जात होती. तिच्यासोबत एक महिला प्रवासी बसली. तिने गर्दीचा फायदा घेऊन ३५ हजार रुपये रोख व सोन्याचे दागिने असलेली बॅग हळूच काढून घेतली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पुष्पा तांडा यांनी शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दुसऱ्या घटनेत यवतमाळ शहरातील शासकीय वसाहतीमध्ये देवी शंकर कोडापे यांच्या घराच्या बेडरूममधून चोरट्याने १ लाख ६५ हजार रुपये रोख असलेली बॅग अलगद काढून नेली. ही घटना बुधवारी रात्री अाठच्या सुमारास घडली. याप्रकरणी देवी कोडापे यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. दारव्हा येथे चोरट्यांनी किन्ही वळगी शेतशिवारातून दत्ता बारकाजी नेवारे यांची एमएच-२९-एव्ही-२६१० क्रमांकाची दुचाकी लंपास केली.
जिल्ह्यात मागील दोन महिन्यांत ५८ चोरीच्या घटना घडल्या आहेत. यातील एकही गुन्हा उघडकीस आलेला नाही. सातत्याने चोरटे मुद्देमाल लंपास करीत आहे. केवळ नेर पोलिसांनी घरफोडी व चोरीचे चार गुन्हे उघड केले. त्यात चोरीचा मुद्देमाल घेणाऱ्यांनाही रेकॉर्डवर आणण्यात आले. अशी कारवाई इतर पोलीस ठाण्यांमध्ये होताना दिसत नाही.
चोरीच्या गुन्ह्याचा तपास होत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तुम्ही घरात असाल, प्रवासात असाल तरी सुरक्षितता नाही. कधी कोठून चोर तुमचा मुद्देमाल घेऊन पळून जाईल, याची शाश्वती नाही. चोरट्यांनी निर्माण केलेली दहशत मोडीत काढण्याचे पोलिसांपुढे आव्हान आहे.
साडेसात लाखांच्या सोने चोरीचा तपास नाही
- पोस्टल मैदानाच्या परिसरातील खासगी रुग्णालयात मारेगाव येथून उपचारासाठी आलेल्या शिक्षिकेचे साडेसात लाखांचे दागिने लंपास केले. या गुन्ह्यातील महिला सीसीटीव्ही फुटेजमध्ये आली आहे. त्यानंतरही शहर पोलिसांकडून या महिलेचा शोध घेण्यात आला नाही. सुरुवातीला चौकशी करण्यात आली. मात्र, अजूनही हा गुन्हा उघड झाला नाही. असे अनेक चोरीचे गुन्हे पोलीस ठाण्याच्या फाइलमध्येच बंद आहेत.