यवतमाळ : डरकाळी फोडत वाघाने घेतली झेप; पण पंजा अडकला अन् पंढरी बचावला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2022 09:01 PM2022-12-10T21:01:39+5:302022-12-10T21:02:32+5:30
नायगाव शिवारातील थरार : नागरिकांची झाली एकच पळापळ
संतोष कुंडकर
वणी (यवतमाळ) : तो वाघ बघण्यासाठी शेतात शिरला... यावेळी कुंपणापलीकडे तुरीच्या ओळीत वाघ लपून बसला होता; पण याची तिळमात्र कल्पना त्याला नव्हती. तो वाघाच्या टप्प्यात येताच वाघाने डरकाळी फोडत एका बेसावध क्षणी त्याच्यावर झेप घेतली; परंतु त्याचे दैव बलवत्तर म्हणून वाघाचा पंजा शेताच्या कुंपणात अडकला आणि मोठी दुर्घटना टळली. अंगावर शहारे आणणारा हा थरार शनिवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास वणी तालुक्यातील नायगाव शेतशिवारात घडला.
पंढरी जीवने असे व्याघ्र हल्ल्यातून बचावलेल्या शेतमजुराचे नाव असून, ते नायगाव (बु.) येथील रहिवासी आहेत. गेल्या काही दिवसांपासून नायगाव (बु.) परिसरात वाघाचा वावर आहे. शनिवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास नायगाव (बु.) शेतशिवारातील विनोद बोबडे यांच्या शेतात अचानक वाघ शिरला. या वाघाला काहींनी बघितले. पाहता पाहता ही वार्ता वाऱ्यासारखी परिसरात पसरली. नायगाव (बु.) येथील नागरिकांनी वाघ बघण्यासाठी बोबडे यांच्या शेताकडे धाव घेतली. या गर्दीत पंढरी जीवने हादेखील होता. पंढरी मोठ्या हिम्मतीने शेतातील तुरीच्या ओळीकडे सरसावला.
मात्र, शेतात असलेल्या तारेच्या कुंपणापलीकडे तुरीच्या पिकात वाघ बसून होता. याची पुसटशीही कल्पना पंढरीला नव्हती. शेताभोवती जमलेली नागरिकांची संपूर्ण गर्दी वाघ कुठे दिसतो का, याची चाचपणी करीत असताना पंढरी टप्प्यात येताच तुरीजवळ बसून असलेल्या वाघाने पंढरीवर झेप घेतली. मात्र, झेप घेताना वाघाचा पाय कुंपणात अडकला. वाघाने डरकाळी फोडताच एका क्षणात नागरिकांची पळापळ सुरू झाली. पंढरी जीवने यानेदेखील तेथून पळ काढला. दरम्यान, या घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आल्यानंतर वणी येथून वनविभागाचे एक पथक घटनास्थळी पोहोचले. या पथकालादेखील तेथे वाघ दिसला. त्यानंतर तेथून हुसकावून लावले.
नायगाव (बु.) शेतशिवारात वाघ असल्याची माहिती मिळताच घटनास्थळाकडे एक पथक रवाना केले. या पथकालादेखील तेथे वाघ दिसून आला. मात्र, शेतमजुरावर वाघाने हल्ल्याचा प्रयत्न केला, याबाबत कोणतीही माहिती नाही. वाघाला तेथून हुसकावून लावण्यात आले आहे.
गणेश महांगडे,
आरएफओ, वणी.