नृशंसतेचा कडेलोट! अपहरण करून महिलेवर चौघांचा पाशवी अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2023 01:56 PM2023-06-30T13:56:58+5:302023-06-30T14:04:36+5:30
दारू पाजण्याचा प्रयत्न : महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
वणी (यवतमाळ) : चुना भट्टीवर काम करणाऱ्या एका ५० वर्षीय महिलेचे अपहरण करून तिच्यावर पाशवी अत्याचार करण्यात आल्याची घटना वणी तालुक्यातील राजुर कॉलरी येथे घडली. या घटनेने राजुर कॉलरी गाव हादरले असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान, गुरूवारी रात्री या प्रकरणी वणी पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली. ही संतापजनक घटना २८ जूनला सायंकाळी ५ ते रात्री ११ वाजताच्या दरम्यान घडली.
विठ्ठल ज्ञानेश्वर डाखरे (३९) रा. टागोर चौक, कपिल व्यंकटेश अंबलवार (३५) रा. जैताई नगर, मनोज अजाबराव गाडगे (४७) रा. रामपुरा वार्ड, वैभव घनश्याम गेडाम (२२) रा. आय.टी. आय. जवळ लालगुडा अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींविरूद्ध भादंवि ३५४, ३५४ (अ),(१)(एक), ३६६, ३७६(ड), ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोबतच अॅट्रॉसिटीचेही गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
आरोपीपैकी विठ्ठल डाखरे याचे पीडित महिलेच्या मुलाकडे पैसे होते. ते मागण्यासाठी विठ्ठल डाखरे व त्याचे अन्य तीन सहकारी बुधवारी सायंकाळी राजुर कॉलरी येथील चुना भट्टी परिसरात गेले. यावेळी पीडिता घरी होती. तिने मुलगा घरी नसल्याचे सांगितले. तुझा मुलगा कुठे आहे ते आम्हाला दाखव असे म्हणून तिला जबरदस्तीने कारममध्ये बसविले. त्यानंतर हे आरोपी पीडितेला घेऊन वणीत आले. येथील मुकूटबन मार्गावर असलेल्या एका बियरबारमध्ये आरोपींनी मद्यप्राशन केले. त्यानंतर ते परत कारमध्ये आले. त्यांनी तिला दारू पाजण्याचाही प्रयत्न केला. त्यानंतर पीडितेला घेऊन आरोपी मारेगाव तालुक्यातील खडकी (बुरांडा) वरून करणवाडी मार्गे नवरगावला पोहोचले. तेथे शेत शिवारात या आरोपींनी या महिलेवर पाशवी अत्याचार केले.
या महिलेसोबत अनैसर्गिक कृत्य देखील करण्यात आल्याचे समोर आले आहे. दरम्यान, आरोपींनी पीडितेला पुन्हा राजुर कॉलरी येथील रेल्वे क्रॉसिंगजवळ आणून सोडले. या घटनेनंतर पीडित महिलेने गुरूवारी वणी पोलीस ठाणे गाठून घडलेल्या घटनेची रितसर तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वेगाने तपास करत अवघ्या काही तासांतच महिलेवर अत्याचार करणाऱ्या चारही आरोपींना बेड्या ठोकल्या.
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलिस अधीक्षक पियुष जगताप, एसडीपीओ गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार अजित जाधव, एपीआय माया चाटसे, सपोनि माधव शिंदे, सपोनि आशिष झिमटे, पोलिस शिपाई विजय वानखेडे, अमोल नुनेलवार, शुभम सोनुले, रवी इसनकर यांनी केली.