नाट्यगृह दोन महिन्यात होणार पूर्ण

By admin | Published: July 17, 2016 12:41 AM2016-07-17T00:41:38+5:302016-07-17T00:41:38+5:30

येथील बसस्थानक चौकातील नाट्यगृह येत्या दोन महिन्यात पूर्णत्वास जाण्याची शक्यता आहे.

The theater will complete in two months | नाट्यगृह दोन महिन्यात होणार पूर्ण

नाट्यगृह दोन महिन्यात होणार पूर्ण

Next

दीड ‘तप’ उलटले : आतील कामाला आला वेग, कलावंतांना मिळणार हक्काचे व्यासपीठ
यवतमाळ : येथील बसस्थानक चौकातील नाट्यगृह येत्या दोन महिन्यात पूर्णत्वास जाण्याची शक्यता आहे. नाट्यगृहाचे काम सुरू होऊन दीड ‘तप’ उलटल्यानंतर आता कुठे ते पूर्णत्वाकडे पोहोचत आहे.
जवळपास दीड तपापूर्वी स्थानिक नगरपरिषदेने शहरातील बसस्थानक चौक परिसरात नाट्यगृह उभारणीचे काम हाती घेतले होते. शहरातील होतकरू आणि नवोदित गुणी कलावंतांना शहरातच व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या नाट्यगृहाच्या उभारणीचे काम जोमाने सुरू झाले होते. तत्कालीन मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी या नाट्यगृहाचे भूमिपूजन केले होते. या नाट्यगृहामुळे शहरातीलच नव्हे, तर जिल्ह्यातील नवोदीत कलावंत आणि कला रसिकांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. आपल्या शहरातच कला सादरीकरणासाठी व्यासपीठ उपलब्ध होणार असल्याने सर्वच हरखून गेले होते.
भूमिपूजनानंतर मात्र अत्यंत संथगतीने या नाट्यगृहाची उभारणी सुरू झाली. वेळोवेळी निधीची कमतरता जाणवू लागली. दरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे केंद्रात गृहमंत्री म्हणून गेले. तरीही येथील नाट्यगृहाचे काम रखडले. नगरपरिषदेने प्रत्येकवेळी निधीसाठी शासनाकडे तगादा लावला. अनेकदा स्वत:च्या कर मिळकतीतून जुजबी कामे उरकविली. मात्र अद्यापही हे नाट्यगृह पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील गुणी कलावंतांना अद्यापही आपली कला सादर करण्यासाठी जिल्ह्यात हक्काचे व्यासपीठ मिळू शकले नाही.
दरम्यान, नाट्यगृहाच्या कामाने आता पुन्हा चांगलाच वेग धरला आहे. आतील कामे वेगाने सुरू झाली आहेत. परिणामी येत्या दोन महिन्यांत हे नाट्यगृह पूर्णत्वास जाण्याची शक्यता बळावली आहे. दोन महिन्यात खरोखरीच नाट्यगृह पूर्ण झाल्यास जिल्ह्यातील नवोदीत व गुणी कलावंतांना आपली कला सादर करण्याची मोठी संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. (शहर प्रतिनिधी)

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळाही बसविणार
याच नाट्यगृह परिसरात एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारला जाणार आहे. अमरावती येथील कारागिरांवर हा अश्वारूढ पुतळा तयार करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. हा पुतळाही लवकरच या परिसरात बसविण्यासाठी नगरपरिषदेची तयारी सुरू आहे. मात्र प्रत्यक्षाता त्याला आणखी किती वेळ लागेल, याची शाश्वती मात्र कुणीच देऊ शकत नाही.

 

Web Title: The theater will complete in two months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.