अॅडिशनल एसपींच्या बंगल्यासमोरच चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 11:43 PM2019-02-02T23:43:36+5:302019-02-02T23:44:26+5:30
स्थानिक दारव्हा रोडवरील अपर पोलीस अधीक्षकांच्या बंगल्यासमोरील ट्रान्सपोर्टचे दुकान फोडून १२ लाख रुपये किंमतीचे ३५ तोळे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याची घटना शनिवारी पहाटे उघडकीस आली. पोलिसांच्या नाकावर टिच्चून झालेल्या या चोरीने पोलीस दलात खळबळ निर्माण झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : स्थानिक दारव्हा रोडवरील अपर पोलीस अधीक्षकांच्या बंगल्यासमोरील ट्रान्सपोर्टचे दुकान फोडून १२ लाख रुपये किंमतीचे ३५ तोळे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याची घटना शनिवारी पहाटे उघडकीस आली. पोलिसांच्या नाकावर टिच्चून झालेल्या या चोरीने पोलीस दलात खळबळ निर्माण झाली आहे.
श्रीकांत सुरेश आसोपा असे यातील फिर्यादीचे नाव आहे. पोलीस अधीक्षकांच्या बंगल्यासमोरील आशीर्वाद कॉम्प्लेक्समध्ये त्यांचे गोविंदकृपा ट्रान्सपोर्ट आहे. आसोपा यांच्याकडे उद्योग भवन मागील गजानन नगरीतील घरी २०१३ ला सात लाखांची चोरी झाली होती. आसोपा यांना अमरावतीला तेरवीच्या कार्यक्रमाला जायचे होते. घरी सोने सुरक्षित नाही म्हणून त्यांनी आपल्या ट्रान्सपोर्टच्या दुकानात ते आणून ठेवले. अपर पोलीस अधीक्षकांचा बंगला असल्याने पोलीस कर्मचाऱ्यांची सातत्याने ये-जा सुरू असते. त्यामुळे त्या परिसरात चोरी होणार नाही, असे मानून आसोपा यांनी दुकानात सोने ठेवले. मात्र तेथेही चोरट्यांनी त्यांचा घात केला. शनिवारी ते दुकान उघडण्यासाठी गेले असता चोरीची घटना उघड झाली. विशेष असे चोरी झालेल्या दुकानाच्या समोरच अपर पोलीस अधीक्षक तसेच अनेक अधिकाºयांचे बंगले, शेकडो पोलीस कर्मचाºयांची पळसवाडी कॅम्प ही वसाहत आहे. अधीक्षकांच्या बंगल्यावर २४ तास पोलीस गार्ड तैनात असते. मात्र त्यानंतरही चोरट्यांना पोलिसांची भीती वाटली नाही. या तैनात पोलिसांना आव्हान देत चोरट्यांनी १२ लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांवर हात मारला. ३५ तोळ्यापैकी २० तोळे तारण असलेले सोने नुकतेच आसोपा यांनी सोडून आणले होते. घटनेची तक्रार अवधूतवाडी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली. पोलिसांनी सुरुवातीला थातूरमातूर तक्रार नोंदविण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. हे श्वान पेट्रोल पंपामागील आर्णी रोडपर्यंतच्या एका झोपडपट्टीपर्यंत गेल्याचे पोलिसांनी सांगितले.
चौघे कॅमेऱ्यांत कैद
या चोरी प्रकरणी सीसीटीव्ही कॅमेरात चार जण आणि एक कार कैद झाली आहे. दोन जण पायºया उतरताना दिसत आहे. हे फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले.
जवळच्या व्यक्तीवर संशय
या चोरीप्रकरणी दुकान व परिवारात वावर असणारा जवळचाच कुणी तरी टीप देणारा असावा असा संशय व्यक्त केला जात असून त्याचा शोध सुरू आहे.