पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात चोरी; सहा कक्षाचे तोडले कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:23 PM2020-12-06T16:23:12+5:302020-12-06T16:23:19+5:30

निर्ढावलेल्या चोरट्यांनी एसपींनाच दिले आव्हान 

Theft in the office of the Superintendent of Police; Six-room broken lock | पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात चोरी; सहा कक्षाचे तोडले कुलूप

पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात चोरी; सहा कक्षाचे तोडले कुलूप

Next

यवतमाळ: शहरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरू आहे. निर्ढावलेल्या चोरट्यांनी थेट जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या चाब्या लंपास केल्या. या प्रकारामुळे खुद्द पोलीस अधीक्षकांनाच काही काळ कक्षाबाहेर ताटकळत उभे रहावे लागले. ही घटना शनिवारी सकाळी घडली. मात्र त्यानंतर याबाबत प्रचंड गोपनीयता बाळगण्यात आली. 

जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या चाब्या अज्ञात चोरट्याने लंपास केल्या. हा प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला. पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ कार्यालयात आल्यानंतरही त्यांचा कक्ष बंदच होता. तेथील कार्यरत शिपायाने चाब्यांची शोधाशोध केली. ज्या ठिकाणी दररोज चाब्यांचा गुच्छा ठेवला जातो तेथे चाब्या नव्हत्या. हा प्रकार पाहून पोलीस अधीक्षक संतापले. त्यांनी तत्काळ या घटनेचा पंचनामा करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बावीस्कर यांना पाचारण केले. चाब्या कुणी चोरल्या याचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्हीचे फुटेज तपासण्याचे आदेश दिले. तेव्हा दुसरा धक्का बसला.

एसपी कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेरे मागील तीन दिवसांपासून बंद असल्याची बाब पुढे आली. कठोर शिस्तीवर विश्वास असणाऱ्या पोलीस अधीक्षकांचा नंतर पारा चांगलाच भडकला. अहोरात्र सुरक्षा गार्ड तैनात असते. शिवाय कक्षासमोरही पोलीस शिपाई पूर्णवेळ उपस्थित असतात. अशा कडेकोट सुरक्षेतून चाब्या चोरी गेल्याच कशा असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जाणीवपूर्वक आव्हान निर्माण करण्यासाठी हे कृत्य केले असावे असा सूर ऐकायला मिळत आहे. 

कुलूप तोडण्याची नामुष्की  

चाब्या चोरी गेल्याने एसपी कार्यालयातील सहा कक्षाचे कुलूप तोडण्याची नामुष्की ओढवली. पोलीस अधीक्षकांचे कक्ष, जिल्हा विशेष शाखा, स्टेनोचे कक्ष, अभ्यागत कक्ष, गृहउपअधीक्षकांच्या कक्षाचे कुलूप तोडण्यात आले. तत्पूर्वी त्याचा पंचनामा करण्यात आला. 

शहरात चोरट्यांचा धुमाकूळ 

शहरातील विविध भागात चोरीच्या सातत्याने घटना होतात. त्यातील बहुतांश गुन्हे उघडकीसच येत नाही. जनसामान्यांच्या मालमत्तेवर चोरटे हात साफ करीत आहे. आता खुद्द जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयालाच चोरट्याने लक्ष केले आहे. यापूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या बंगल्यातून चंदनाची झाडे चोरीला गेली होती. त्यानंतर चोरट्याने थेट पोलीस अधीक्षक कार्यालयातच हात मारल्याने पोलीस दलाची लक्तरे वेशीवर टांगल्या गेली आहे. 
 

सुरक्षा देणारे कार्यालयच असुरक्षित

पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या परिसरात सर्वसामान्य व्यक्ती पाय ठेवण्याची हिंमत करीत नाही. फाटकावरच त्याची चौकशी केली जाते. अशा स्थितीत चोरट्याने अगदी पोलीस अधीक्षकांच्या कक्षाबाहेर टांगून असलेल्या चाब्यांचा गुच्छा पळविल्याने सुरक्षेची हमी देणारे कार्यालयाच असुरक्षित असल्याो दिसून येते.

Web Title: Theft in the office of the Superintendent of Police; Six-room broken lock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.