फुलसावंगी येथे चोरीचे सत्र सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:31 AM2021-07-17T04:31:20+5:302021-07-17T04:31:20+5:30
फुलसावंगी : येथील जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालयात १३ जुलैच्या रात्री चोरी झाली. सराईत गुन्हेगाराने ६० ते ७० डेक्स, बेंच ...
फुलसावंगी : येथील जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालयात १३ जुलैच्या रात्री चोरी झाली. सराईत गुन्हेगाराने ६० ते ७० डेक्स, बेंच तोडून लोखंड चोरून नेले. मात्र, अद्यापही आरोपीवर कोणतीच कारवाई झाली नाही.
चोरी होत असल्याची माहिती मिळताच परिचर एम.एस. रणमले यांनी घटनास्थळ गाठले. त्यावेळी गोपाल दादाराव शिंदे हा एका मोठ्या पोत्यात डेक्स, बेंचचे तोडलेले लोखंडी साहित्य घेऊन जाताना आढळला. त्याचा पाठलाग केला असता त्याने मैदानालगतच्या भंगार दुकानाच्या रिकाम्या जागेत लोखंडाने भरलेले पोते फेकून पळ काढला. या घटनेची माहिती महागावचे सहायक पोलीस निरीक्षक बालाजी शेंगेपल्लू यांना शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विवेक पांढरे यांनी दिली. परंतु घटनास्थळी पोहोचण्यास पोलिसांना तब्बल दीड तास लागला.
जिल्हा परिषद शाळेतील नवीन डेक्स, बेंच तोडून चोरट्याने सीसीटीव्ही कॅमेरे, लाईटची तोडफोड केली. या शासकीय मालमत्तेच्या नुकसानीची भरपाई आरोपीकडून करण्याची मागणी पालकांमधून होत आहे. सध्या फुलसावंगी येथे चोऱ्याचे सत्र सुरू असूनही आरोपी शोधण्यात महागाव पोलिसांना यश आले नाही. गुन्हेगारांना साधे चौकशीसाठी बोलविण्यात आले नाही. विशेष म्हणजे येथील दाेन किराणा दुकानात यापूर्वी चोरी झाली. ग्रामपंचायत कार्यालयातून खुर्ची चोरीला गेली. प्राथमिक मराठी शाळेतून इन्वर्टर, बॅटरी, सीसीटीव्ही कॅमेरे व इतर साहित्य लंपास झाले. ही सर्व ठिकाणे पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर आहे. तरीही एकाही घटनेतील आरोपी पोलिसांना गवसला नाही.
बॉक्स
पोलीस चौकी शोभेची वास्तू
येथे पोलीस चौकी निर्माण होऊन जवळपास दोन वर्षे उलटली. या चौकीत एक अधिकारी, चार कर्मचाऱ्यांची नियुक्ती असल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात येथे कोणताही कर्मचारी रात्री उपस्थित राहत नाही. या चौकीचा उपयोग केवळ ‘सेटलमेंट’साठी केला जातो, अशी चर्चा खुद्द पोलिसांच्या दोन नामांकित पंटरांकडूनच केली जात आहे. त्यामुळे पोलीस चौकी केवळ शोभेची वास्तू ठरली आहे.