भंगारच्या दुकानातून लागला दुचाकी चोरीचा छडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2021 05:00 AM2021-11-01T05:00:00+5:302021-11-01T05:00:25+5:30
सद्दाम रफिक बैलीम (३२, रा. दत्तनगर आर्णी), राजीक रफिक शेख (१९, रा. देऊरवाडा पुनर्वसन) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या दोघांच्या गॅरेजमध्ये दुचाकीचे भाग सुटे केले जात असल्याची गोपनीय माहिती आर्णी पोलिसांना मिळाली. पोलीस उपनिरीक्षक किशोर खंडार, मनोज चव्हाण, अक्षय ठाकरे, मिथुन जाधव यांनी या संपूर्ण प्रकरणाची आणखी माहिती मिळविणे सुरू केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना घडत आहेत. दुचाकी तर सर्रासच चोरीला जात आहेत. दिवसाला किमान १० ते १५ घटना दुचाकी चोरीच्या होत आहेत. आतापर्यंत दुचाकी चोरट्यांचा माग पोलिसांना काढता आला नव्हता. आर्णी पोलिसांनी एका गोपनीय माहितीची शहानिशा केली. त्यातून धक्कादायक प्रकार पुढे आला. शहरातील एका भंगारच्या दुकानात दुचाकीचे सुटे भाग केले जात असल्याची माहिती मिळाली. यातून चोरीचे रॅकेट पुढे आले.
सद्दाम रफिक बैलीम (३२, रा. दत्तनगर आर्णी), राजीक रफिक शेख (१९, रा. देऊरवाडा पुनर्वसन) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या दोघांच्या गॅरेजमध्ये दुचाकीचे भाग सुटे केले जात असल्याची गोपनीय माहिती आर्णी पोलिसांना मिळाली. पोलीस उपनिरीक्षक किशोर खंडार, मनोज चव्हाण, अक्षय ठाकरे, मिथुन जाधव यांनी या संपूर्ण प्रकरणाची आणखी माहिती मिळविणे सुरू केले.
शहरातील पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या सद्दाम मोटर गॅरेजमध्ये दुचाकीचे भाग सुटे केले जातात, अशी पोलिसांची खात्री झाली. त्यानंतर शिताफीने पोलीस पथकाने हे गॅरेज गाठले. त्यावेळी दोन्ही आरोपी हिरो कंपनीच्या स्प्लेंडर कंपनीचे भाग वेगळे करत होते. पोलिसांना या दुचाकीची नंबरप्लेट (एमएच २९, बीएस ९८९१) असल्याचे आढळले. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करत सुटे भाग असलेला मुद्देमाल ताब्यात घेतला. नंतर ही दुचाकी चोरीची असल्याचे निष्पन्न झाले.
दारव्हा पोलिसांनी आरोपींना घेतले ताब्यात
- दारव्हा शहरातून चोरी गेलेली दुचाकी आर्णीत एका गॅरेजमध्ये सुटे भाग केले जात असताना सापडली. त्यामुळे दोन्ही आरोपींना दारव्हा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याचा तपास सुरू आहे.
- सातत्याने शहरात व ग्रामीण भागातून दुचाकी चोरीच्या घटना घडत आहेत. शहरातून चोरी गेलेल्या दुचाकी अतिशय कमी दरात विकल्या जातात. त्याची अधिक रक्कम व्हावी यासाठी काही जण तिचे सुटे भाग करतात.
- भंगारमध्ये सुट्या भागाला चांगली किंमत येत असल्याने सध्या चोरीच्या दुचाकींचे सुटे भाग करून विक्री करण्याचा गोरखधंदा सुरू आहे. मात्र, अजूनही पोलिसांच्या तपास यंत्रणेचे लक्ष नाही.