त्यांची’ मुले जाणार विरोधी पक्षनेत्यांच्या शाळेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 10:32 PM2018-06-06T22:32:04+5:302018-06-06T22:32:04+5:30
व्यवस्थेने घात केलेल्या जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांनी सरकारचा निषेध करीत आत्महत्या केली. त्यांच्या कुटुंबीयांकडे स्थानिक सत्ताधारी, विरोधकांनी पाठ फिरविली असली, तरी परजिल्ह्यातून आलेल्या काँग्रेसच्या विरोधी पक्षनेत्यांनी मात्र मोठा दिलासा दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : व्यवस्थेने घात केलेल्या जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांनी सरकारचा निषेध करीत आत्महत्या केली. त्यांच्या कुटुंबीयांकडे स्थानिक सत्ताधारी, विरोधकांनी पाठ फिरविली असली, तरी परजिल्ह्यातून आलेल्या काँग्रेसच्या विरोधी पक्षनेत्यांनी मात्र मोठा दिलासा दिला आहे. या दोन्ही शेतकºयांच्या मुलांना आता त्यांच्या नामवंत शाळेत मोफत प्रवेश दिला जाणार आहे.
टिटवी (ता. घाटंजी) येथील शेतकरी प्रकाश मानगावकर व राजूरवाडीचे शंकर भाऊराव चायरे यांनी आत्महत्या केली. शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे देवानंद पवार यांनी ही बाब काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कानावर घातली. त्यांनी लगेच यवतमाळ जिल्ह्याचा दौरा केला. त्यावेळी त्यांनी आर्थिक मदतीसह मुलामुलींच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली. त्यानुसार विखे पाटील यांनी प्रत्येकी एक लाख रुपयांचे धनादेश पाठविले. ते मानगावकर व चायरे कुटुंबाला वितरित करण्यात आले.
यावेळी पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे राज्य उपाध्यक्ष भागवत देवसरकर, शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे मिलिंद धुर्वे, यशवंत इंगोले, शैलेश इंगोले, गजानन पाथोडे, सैय्यद छब्बू, शालिक चवरडोल, सैय्यद रफिक, संजय डंभारे, विश्वास निकम, गोपाल उमरे, रजनीश मानगावकर, विनोद मडावी, प्रमोद गंडे, नामदेव येलादी, रोहितसिंग सिद्धू उपस्थित होते.
पाच विद्यार्थ्यांची जबाबदारी
शंकर चायरे यांची मोठी मुलगी जयश्री हिला रेमंड कंपनीमध्ये शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीच्या मध्यस्थीमधून नोकरी मिळाली आहे. धनश्री बी.एस्सीच्या दुसºया वर्षाला, भाग्यश्री बारावीला, तर लहान मुलगा आकाश नवव्या वर्गात आहे. प्रकाश मानगावकर यांची मुलगी बारावीला तर मुलगा तिसºया वर्गात आहे. या सर्वांना चालू शैक्षणिक सत्रापासून राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शैक्षणिक संस्थेत प्रवेश देण्यात येणार आहे. देवानंद पवार यांच्यावर त्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सावळेश्वर (ता. उमरखेड) येथील माधव रावते या शेतकºयाने स्वत:ची चिता रचून आत्महत्या केली होती. त्यांच्या कुटुंबालाही विखे पाटील यांच्यातर्फे एक लाख रूपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे.