यवतमाळात चोरांच्या तब्बल १५ टोळ्या

By admin | Published: December 31, 2015 02:37 AM2015-12-31T02:37:35+5:302015-12-31T02:37:35+5:30

कुठेही चोरी झाली की वर्षानुवर्षे रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगारांनाच तपासायचे या पॅटर्नला छेद देत यवतमाळ शहर पोलिसांनी अशा गुन्हेगारांची कुंडली तयार केली आहे.

There are 15 gangs of thieves in Yavatmal | यवतमाळात चोरांच्या तब्बल १५ टोळ्या

यवतमाळात चोरांच्या तब्बल १५ टोळ्या

Next

पोलिसांनी बनविली कुंडली : नवे गुन्हेगार आले रेकॉर्डवर, प्रत्येकाची गुन्ह्यांची पद्धत वेगळी
यवतमाळ : कुठेही चोरी झाली की वर्षानुवर्षे रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगारांनाच तपासायचे या पॅटर्नला छेद देत यवतमाळ शहर पोलिसांनी अशा गुन्हेगारांची कुंडली तयार केली आहे. त्यात एकट्या यवतमाळ शहरात चोरट्यांच्या एक-दोन नव्हे तर तब्बल १५ टोळ्या सक्रिय असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली. या सर्व गुन्हेगारांना शहर पोलिसांनी आता रेकॉर्डवर घेतले आहे.
पोलिसांच्या रेकॉर्डवर आजही वर्षानुवर्षांपासूनचेच गुन्हेगार नमूद आहेत. कित्येकांनी चोरीचा मार्गही सोडला आहे. मात्र त्यानंतरही त्यांचे रेकॉर्ड कायम असून पोलीस चोरी झाली की त्याला तपासतात. जिल्ह्यातील बहुतांश पोलीस ठाण्यांमध्ये हाच फंडा वापरला जातो. चोरी झाल्यानंतर रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासणे एवढीच खानापूर्ती केली जाते. अनेकदा दबाव वाढल्यास रेकॉर्डवर असलेल्यांपैकीच एका-दोघांना अटक दाखवून तपासातील प्रगतीचा देखावा निर्माण केला जातो. त्यांच्याकडून कोणतीच जप्तीही होत नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून पोलीस दलात हा पायंडा पडला आहे. परंतु यवतमाळ शहर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने याला फाटा देत गुन्हेगारी वर्तुळातील नव्या चेहऱ्यांची कुंडली तयार केली आहे. कालबाह्य झालेल्या व गुन्हेगारीचा खरोखरच मार्ग सोडलेल्या व्यक्तींना रेकॉर्डवरून हटविण्यात आले आहे. त्यांच्यावर वॉच मात्र कायम आहे. जुनी नावे हटवून नवी नावे रेकॉर्डवर घेतली गेली आहे.
यवतमाळ शहरात गल्लीबोळात गुन्हेगारांच्या अनेक नव्या टोळ्या तयार झाल्या आहेत. त्यात १२ ते १५ अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. गेल्या काही वर्षांपासून ते गुन्हे करीत होते. मात्र त्यांचे रेकॉर्ड नसल्याने पोलिसांची त्यांच्यावर नजरच जात नव्हती. एखादवेळी संशय आला तरी त्यांच्या निरागस चेहऱ्यामागील गुन्हेगार पोलिसांच्या दृष्टीस पडत नव्हता. परंतु पोलिसांनी गुप्तचर व खबऱ्यांच्या मदतीने यवतमाळ शहरातील नव्या गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबविली. तेव्हा यवतमाळ शहरात एक-दोन नव्हे तर नव्या गुन्हेगारांच्या तब्बल १५ टोळ्या कार्यरत असल्याची खळबळजनक माहिती पुढे आली. या बहुतांश टोळ्या चोरी-घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये सक्रिय आहेत. शरीरासंबंधीच्या लहान-मोठ्या गुन्ह्यांमध्येही त्यांचा सहभाग आढळून आला आहे. भोसा रोड, इंदिरानगर, बांगरनगर, वाघाडी, मोहा या भागातील या टोळ्या अधिक सक्रिय आहे. या सर्व टोळ्यांची सचित्र कुंडली शहर ठाण्याच्या डीबी रुममध्ये पहायला मिळते. या टोळी सदस्यांच्या नाव, गाव, पत्ता, नातेवाईकांची नावे, पत्ते अशी सर्व माहिती तत्काळ पोलिसांना एका क्लिकवर उपलब्ध होते. सुरुवातीला प्रतिबंधात्मक कारवाई करून या गुन्हेगारांना पोलिसांनी रेकॉर्डवर घेतले. नंतर त्यांचा भादंविच्या गुन्ह्यांमध्ये सहभाग आढळून आला. या प्रत्येक टोळीची मोडस आॅप्रेन्डी (गुन्ह्याची पद्धत) वेगवेगळी आहे. कुणी दुपारी गुन्हा करतो तर कुणी सायंकाळी. त्यात अर्ध्या तासात गेम वाजविणारेही सदस्य आहेत. कुणी मुलाला ट्युशनला सोडण्यासाठी घराला कुलूप लावून बाहेर गेल्यास नेमक्या तेवढ्या १५ ते २० मिनिटात घर फोडून दागिन्यांवर हात साफ करणारी टोळीही सक्रिय आहे. या प्रत्येक टोळीने किमान दहा ते १५ गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे. तशी नोंदही त्यांच्या नाव पोलीस रेकॉर्डवर करण्यात आली आहे. यातील पुनेश्वर, जितू, अविनाश या गुन्हेगारांना न्यायालयाने शिक्षाही ठोठावल्या आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)

बसस्थानक, बाजारपेठेत महिला लुटारू सक्रिय
पोलिसांनी रेकॉर्डवर घेतलेल्या या सक्रिय गुन्हेगारी टोळ्यांमधील बहुतांश सदस्य हे कारागृहात आहेत. तीन ते चार टोळ्यांचे सदस्य अमरावती मध्यवर्ती कारागृहात तर इतर टोळ्यांचे सदस्य यवतमाळ जिल्हा कारागृहात आहेत. बांगरनगरातील चिकण्या व वट्ट्या यांची पाच ते सहा सदस्यांची टोळी मात्र बाहेर असून ती पोलिसांच्या निशाण्यावर असल्याचे सांगण्यात येते. शहरात काही महिलाही सक्रिय आहेत. गोरगरिब महिलांना बाजारपेठेत, बसस्थानकावर त्या लुटतात. दागिने-पर्स त्या लंपास करतात. मात्र त्यांना सतत तपासण्याची, त्यांच्यावर वॉच ठेवण्याची तसदी पोलीस घेत नसल्याची ओरड ऐकायला मिळते. यवतमाळ शहर ठाण्यात नव्या गुन्हेगारांची कुंडली तयार झाली असली तरी वडगाव रोड पोलीस ठाणे अशा कुंडलीपासून अद्याप कोसोदूर असल्याचे सांगण्यात येते. जिल्ह्यातील अन्य पोलीस ठाण्यांची स्थितीही गुन्हेगारांच्या कुंडलीबाबत कमी-अधिक प्रमाणात वडगाव रोड सारखीच आहे.

Web Title: There are 15 gangs of thieves in Yavatmal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.