थोडा हैं थोडे की जरूरत हैं..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 10:27 PM2017-08-01T22:27:46+5:302017-08-01T22:28:20+5:30
प्रज्ञावंत विद्यार्थी देशाची संपत्ती आहे. पण व्यवस्थाच अशी आहे की, अॅडमिशनसाठी नुसते मार्क असून चालत नाही... फीदेखील भरावी लागते.
अविनाश खंदारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : प्रज्ञावंत विद्यार्थी देशाची संपत्ती आहे. पण व्यवस्थाच अशी आहे की, अॅडमिशनसाठी नुसते मार्क असून चालत नाही... फीदेखील भरावी लागते. प्रज्ञेचा अमूल्य दागिना तेथे कवडीमोल ठरतो. असेच दोन हिरे सध्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पैसे नसल्याने तडफडत आहेत. दिनेश सुरेश काटेवाड व ऋषिकेश मारोती निकम हेच ते दोघे.
तालुक्यातील जेवली हे त्यांचे गाव. दुर्गम असलेल्या या गावाने एक दुर्मिळ परंपराही निर्माण केली. गरिबीला न जुमानता मुलांना उच्च शिक्षण द्यायचे. येथून आतापर्यंत २० डॉक्टर मिळाले आहेत. त्यात दिनेश आणि ऋषिकेशच्या रूपाने दोघांची भर पडणार आहे. एमबीबीएसला त्यांचा नंबरही लागला. पण गडगंज शुल्क भरण्याची ताकद मात्र त्यांच्या पालकांकडे नाही. २ आॅगस्टपर्यंत पैसे भरले नाहीत, तर हे विद्यार्थी कदाचित उदरनिर्वाहासाठी रोजमजुरीकडेच वळण्याचा धोका आहे.
दिनेशच्या झोपडीत दिवाही नाही!
दिनेशचे वडील सुरेश काटेवाड हे केवळ १ एकर शेतीचे कास्तकार आहेत. शेतमजुरीवरच त्यांची गुजराण. बालपणापासून हुशार असलेल्या दिनेशला त्यांनी दहावीपर्यंत गावातच शिकविले. नंतर ढाणकीच्या आदिवासी विद्यालयातून तो बारावी उत्तीर्ण झाला. मुलाने डॉक्टर व्हावे, हे स्वप्न पूर्ण होण्याइतके मार्क्स दिनेशला मिळाले. पण ‘निट’चे क्लास लावायचे तर पैसाच नव्हता. शेवटी नांदेडच्या प्राध्यापकाने मोफत वर्गात येऊ दिले. मेहनतीच्या बळावर दिनेशने निटमध्ये ३६६ मार्क्स घेतले. दिनेशचा नागपूरच्या जीएमसी कॉलेजमध्ये एमबीबीएसकरिता नंबर लागला. पण फी भरण्यासाठी पैसाच नाही. त्यांच्या मुलाने ज्ञानाचा प्रकाश खेचून आणलाय. आता समाजाने पुढाकार घेतला, तर हा प्रकाश सर्वव्यापी बनेल.
ऋषिकेशच्या जन्मदात्यांची अजब कोंडी
ट्रकचालक म्हणून काम करणाºया मारोती निकम यांनी मुलगा ऋषिकेशला डॉक्टर करण्याचे स्वप्न पाहत रात्रन्दिवस मेहनत घेतली. याच मेहनतीमुळे तीन वर्षांपूर्वी त्यांची कंबर गेली. आता घरच्या तीन एकर शेतीसह रोजमजुरीवर त्यांची गुजराण सुरू आहे. ऋषिकेशने ढाणकीच्या संत गाडगेबाबा आश्रम विद्यालयातून ६८ टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण केली. ‘निट’च्या परीक्षेतही ३८५ गुण घेतल्याने यवतमाळच्या वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयात त्याचा एमबीबीएसकरिता नंबर लागला आहे. आईवडीलांच्या एका डोळ्यात आनंदाचे तर फीसाठी पैसे नसल्याने दुसºया डोळ्यात दु:खाचे अश्रू आहेत.
नांदेडात करवून घेतले ‘निट’
दिनेश आणि ऋषिकेश अभावग्रस्त वातावरणात घडले. बारावीपर्यंत दुर्दम्य इच्छाशक्तीच त्यांची सारथी झाली. पण बारावीनंतर ‘निट’ परीक्षेची तयारी करायची तर क्लासेस लावावे लागणार, त्यासाठी मोठी फी मोजावी लागणार... या प्रश्नांत दोघेही अडकले. अखेर नांदेडच्या प्राध्यापकाने आपल्या क्लासेसमध्ये त्यांना मोफत प्रवेश दिला. गुणवंत पोरांनीही त्यांच्या मदतीचे चिज केले. दोघेही ‘निट’ उत्तीर्ण झाले. दोघांचाही एमबीबीएसला नंबर लागला. आता पुन्हा प्रश्न उभा राहिला तो प्रवेश शुल्काचाच. अमूल्य गुणवत्ता सिद्ध झाली आहे, केवळ पैशासाठी तिचे दमन होऊ नये, म्हणून समाजाने पुढे यावे, एवढीच अपेक्षा!