टिपेश्वर अभयारण्यामध्ये पर्यटकांना सुविधाच नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 12:44 PM2020-11-21T12:44:08+5:302020-11-21T12:45:02+5:30
Tipeshwar Sanctuary Yawatmal News आतापर्यंत लाखाे रुपयांचा खर्च करुनही टिपेश्वर अभयारण्यात सुविधांची वानवा आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ: घाटंजी येथून अवघ्या २५ किमीवरील टिपेश्वर अभयारण्यात वाघांचे मनसोक्त दर्शन होते. दुर्मिळ वन्य प्राणीही दृष्टीस पडतात. मात्र आतापर्यंत लाखाे रुपयांचा खर्च करुनही टिपेश्वर अभयारण्यात सुविधांची वानवा आहे.
अभयारण्यात दिवसेंदिवस पर्यटकांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे पर्यटक निधी म्हणून लाखो रुपयांचा निधीसुद्धा प्राप्त होतो. मात्र हा निधी विकास कामांवर खर्च न करता मेळघाट येथे पाठविला जात आहे. तालुक्यातील तिपाई देवीच्या नावावरून टिपेश्वर अभयारण्य असे नामकरण करण्यात आले. तेथे टेकडीवर तिपाईचे मंदिर आहे. या अभयारण्याचे क्षेत्र तब्बल १४ हजार ८३२ हेक्टरमध्ये विखुरले आहे. दक्षिणेस तेलंगणातील आदिलाबाद जिल्ह्यातील डोंगरदरे आहे. हे अभयारण्य जैवविविधतेने नटलेले आहे. वघारा येथे नैसर्गिक धबधबा आहे.
वाघांच्या संरक्षणाच्या दृष्टीने हे अभयारण्य महत्वाचे ठरते. येथे वाघांचा मुक्त संचार असतो. मात्र उदासीन अधिकाऱ्यांमुळे विकास होताना दिसत नाही. लाखोंचा खर्च होऊनही सुविधांचा अभाव आहे. सुन्ना व माथनी गेटजवळ शौचालय, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही.
विश्रामगृहात सुविधा नाही. जंगलात पाण्याची सुविधा नाही. बसविलेले सोलर लाईट बंद पडले. लाखोंचे वृक्षारोपणही निष्फळ ठरले. त्यामुळे पर्यटक निराश आहेत.
जनवन योजनेच्या निधीची विल्हेवाट
विकासासाठी डाॅ. श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजनेचा निधी दिला जातो. मात्र हा निधी चुकीच्या पद्धतीने खर्च केला जात आहे. त्यामुळे पालकमंत्री व मेळघाट येथील मुख्य वनाधिकाऱ्यांनी अभयारण्याला भेट देण्याची गरज आहे. त्यांनी समितीच्या निधी खर्चाची पाहणी करणे अपेक्षित आहे. तसेच अभयारण्यातील सर्व वनअधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे सक्तीचे करावे, अशी अपेक्षा आहे.