पोलिस कर्मचाऱ्यांना फेस्टीव्हल अलाऊन्स नाही, केवळ पगारावरच भागवावी लागणार दिवाळी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 06:07 PM2024-10-28T18:07:49+5:302024-10-28T18:09:12+5:30

निवडणूक बंदोबस्ताचा ताण : वेळेपूर्वी पगार दिल्यामुळे कुटुंबीयांनी खरेदीला सुरुवात

There is no festival allowance for police personnel, Diwali has to be paid only on salary | पोलिस कर्मचाऱ्यांना फेस्टीव्हल अलाऊन्स नाही, केवळ पगारावरच भागवावी लागणार दिवाळी

There is no festival allowance for police personnel, Diwali has to be paid only on salary

लोकमत न्यूज नेटवर्क 
यवतमाळ :
अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या पोलिसांना सण-उत्सव कधीच कुटुंबासोबत साजरा करता येत नाही. त्याचा हा त्याग समाजात शांतता ठेवतो. यामुळे इतरांना बिनधास्तपणे सण-उत्सवाचा आनंद घेता येतो. जिल्हा पोलिस दलात कार्यरत असलेल्या अडीच हजारांवर पोलिस कर्मचाऱ्यांना यंदा फेस्टीव्हल अलाऊंस मिळालाच नाही. या कर्मचाऱ्यांना वेळेअगोदर हातात आलेल्या पगारावरच दिवाळीचा सण साजरा करावा लागत आहे. 


पोलिस कर्मचाऱ्यांना दिवाळी सणाच्या पूर्वी १२ हजार रुपये फेस्टीव्हल अलाऊन्स देण्यात येत होता. नंतर ही रक्कम वेतनातून कपात केली जात होती. तर कर्मचाऱ्यांना वार्षिक गणवेश भत्ता दिला जातो. याची पाच हजार रुपये रक्कम दिवाळीपूर्वी देण्यात येत होती. या सोबतच कर्मचाऱ्यांच्या शिल्लक राहिलेल्या रजेचीही रोख रक्कम दिली जात होती. 


या सर्व भत्यांचे नियोजन करून दिवाळीच्या सुरुवातीला हा पैसा पोलिस कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा केला जात होता. वेळेअगोदर मिळालेला पगार आणि विविध भत्त्यांच्या स्वरूपात जमा झालेली ही रक्कम यातून पोलिस कुटुंबीयांना दिवाळी खरेदीचा आनंद घेता येत असे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवरच घरातील मोठ्या वस्तूंची खरेदी करण्याचे नियोजन या येणाऱ्या भत्त्याच्या भरवशावर केले जात होते. यंदा फेस्टीव्हल अलाऊन्स व गणवेश भत्ता पोलिसांना मिळाला नाही. यामुळे केवळ पगारातूनच दिवाळी खरेदी करावी लागत आहे. 


रजा रोखीकरणाची रक्कम वळती 
पोलिस कर्मचाऱ्यांना ऑक्टोबरच्या पगाराची रक्कम दिवाळी असल्याने २३ ऑक्टोबरपासूनच देण्यास सुरुवात झाली आहे. तर शिल्लक रजेचा रोख मोबदलासुद्धा देण्यात येत आहे. ही प्रक्रिया जिल्ह्यात राबविली जात आहे. टप्प्याटप्याने पोलिसांच्या खात्यात जमा होत आहे. आतापर्यंत जवळपास ७०० पोलिस कर्मचाऱ्यांना रजेच्या रोख मोबदल्याचा लाभ मिळाला आहे.


बँकांना सुटी असल्याने एकाच वेळी होत आहे सर्वत्र गर्दी 
सण-उत्सवाच्या काळात बँकांनाही सुटी असल्याने विविध योजनांच्या लाभार्थ्यांसह शासकीय कर्मचारी आणि खासगी आस्थाप- नेतील चाकरमान्यांचीही बँकांमध्ये एकच गर्दी होत आहे. हीच गर्दी खरेदीसाठी बाजारपेठेतही पहावयास मिळत आहे. या गर्दीमुळे अनेकजण ऑनलाईन खरेदीचा पर्याय निवडताना दिसतात. विशेष करून युवा वर्ग याला प्राधान्य देतात.

Web Title: There is no festival allowance for police personnel, Diwali has to be paid only on salary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.