बोगस डॉक्टरांवर कारवाईच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 01:22 AM2017-07-25T01:22:06+5:302017-07-25T01:22:06+5:30
तालुक्यात मोठ्याप्रमाणात बोगस डॉक्टरांचे पेव फुटले आहे. आरोग्य प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केली जात नाही.
आदेशाची पायमल्ली : राळेगाव आरोग्य विभागाकडे माहितीचा अभाव
लोकमत न्यूज नेटवर्क
राळेगाव : तालुक्यात मोठ्याप्रमाणात बोगस डॉक्टरांचे पेव फुटले आहे. आरोग्य प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केली जात नाही. उल्लेखनीय म्हणजे यामध्ये जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशाचीही पायमल्ली होत असल्याचे चित्र आहे.
जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी ८ जानेवारी २०१७ रोजी यवतमाळ येथे जिल्ह्यातील आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना परिसरात कार्यरत असलेल्या बोगस डॉक्टरांची माहिती घेऊन त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्याचे बजावले होते. आज सहा ते सात महिन्यांनंतरही बहुतांश ठिकाणी बोगस डॉक्टरांवर गुन्हे दाखल झालेले नाहीत. केवळ चालढकल सुरू आहे. याबाबत माहिती कायद्यांतर्गत माहिती घेतली असता राळेगाव, कळंब, बाभूळगाव व केळापूर तालुक्यातील आरोग्य विभागाकडे पत्र पाठवून त्यांना माहिती देण्याचे प्रशासनाकडून सूचित करण्यात आले होते. परंतु काही आरोग्य केंद्रातून ही माहिती अद्यापही पुरविण्यात आली नाही. तर काही आरोग्य केंद्रांनी त्यांच्या अखत्यारीतील उपकेंद्रांना ती पुरविण्याबाबत कळविले. एकंदरीत जिल्हा व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडे जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांची नेमकी माहितीच उपलब्ध नसल्याचे यावरून स्पष्ट होते. दहेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांकडून तीन बोगस डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे कळविले, परंतु त्याची तारीख त्यांच्याकडे उपलब्ध नाही. वरध प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत तीन बोगस डॉक्टर कार्यरत असल्याचे दर्शवून विविध कारणे सांगितल्या गेली. यामध्ये एफआयआर दाखल करण्याबाबत संदिग्ध भूमिका घेण्यात आली. धानोरा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गतही तीन बोगस डॉक्टर कार्यरत असल्याचे कळविण्यात आले. तेथेही अशाच प्रकारे झाकाझाक करण्यात आली.
वाढोणा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सहा बोगस डॉक्टर आहेत. तेथे एका बोगस डॉक्टरचा दवाखाना सुरू असून, पाच बंद असल्याचे सांगण्यात आले. परंतु कारवाईबाबत मौन बाळगण्यात आले. मादणी येथे पाच वर्षापासून बोगस डॉक्टर सक्रीय असल्याचे सांगण्यात आले. पण कारवाईबाबत मौन बाळगण्यात आले. याचप्रमाणे करळगाव, उमरी, सावरगाव आदी ठिकाणीही संदिग्ध परिस्थिती आढळून आली.
ग्रामीण भागातील रुग्णांच्या जीविताशी खेळ
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला असून यातून ते केवळ पैशासाठी ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांच्या जिविताशी खेळ करीत आहे. उल्लेखनिय म्हणजे प्रचंड गंभीर असलेल्या या प्रकाराबाबत आरोग्य विभाग पाहिजे तसे गंभीर दिसत नाही. आरोग्य विभागाकडे याबाबत आवश्यक ती माहितीसुद्धा उपलब्ध नाही. ठोस कारवाईसुद्धा यामध्ये झाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळेच अशा बोगस डॉक्टरांचा गोरखधंदा जिल्ह्यात राजरोसपणे सुरू आहे.