दहा रुपयांच्या नाण्यांवर बंदी नाहीच
By admin | Published: March 17, 2017 02:42 AM2017-03-17T02:42:54+5:302017-03-17T02:42:54+5:30
दहा रुपयांच्या नाण्यांबाबत सध्या सर्वत्र संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. ही नाणी बनावट असून ती बंद झाल्याची अफवा पसरविली जात आहे.
स्टेट बँकेचे स्पष्टीकरण : बनावट-बंदची केवळ अफवाच, नाणे स्वीकारणे बंधनकारक
यवतमाळ : दहा रुपयांच्या नाण्यांबाबत सध्या सर्वत्र संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. ही नाणी बनावट असून ती बंद झाल्याची अफवा पसरविली जात आहे. परंतु रिझर्व्ह बँकेने कोणतेही नाणे चलनातून बाद केले नाही. दहा रुपयांची नाणीही चलनात असून ती बँकांच्या सर्व शाखांमध्ये स्वीकारली जात असल्याची माहिती भारतीय स्टेट बँकेचे मुख्य प्रबंधक प्रमोदसिंह बैस यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
गत काही महिन्यांपासून दहा रुपयांची नाणी घेण्यास व्यापारी आणि सर्वसामान्य ग्राहकही नकार देत आहे. नोटबंदीनंतर बाजारात मोठ्या प्रमाणात दहा रुपयांची नाणी आली. त्यामुळे ही नाणी बनावट असल्याची अफवा पसरली. त्याला काही लोकांनी खतपाणी घातले. परिणामी आज दहा रुपयाचे नाणे स्वीकारण्यावरून वादाचे प्रसंग उद्भवत आहे. अनेक ठिकाणी दहा रुपयांचे नाणे घेतले जात नसल्याचे सांगितले जात आहे. काहीजण तर बँकेतही ही नाणी स्वीकारत नसल्याचे सांगत आहे. त्यामुळे दहा रुपयांच्या नाण्यांबाबत नेमकी परिस्थिती जाणून घेण्यासाठी भारतीय स्टेट बँकेच्या यवतमाळ येथील मुख्य शाखेशी संपर्क साधला तेव्हा वेगळेच वास्तव पुढे आले. मुख्य प्रबंधक प्रमोदसिंह बैस म्हणाले, कोणतेही नाणे अथवा नोट व्यवहारातून बाद करायची असल्यास रिझर्व्ह बँक सर्व बँकांना सूचना देते, तशी सूचना बँकेच्या दर्शनी भागात लावली जाते. परंतु रिझर्व्ह बँकेने तशी कोणतीही सूचना दिली नाही. नाणी बंद झाली, ही केवळ अफवा असून आमच्या सर्व शाखांमध्ये दहा रुपयांची नाणी स्वीकारली जात असल्याची त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता दहा रुपयांच्या नाण्यांचा स्वीकार करावा, असेही त्यांनी आवाहन केले. नोटबंदी होताच व्यवहारासाठी दहा रुपयांची नाणी मोठ्या प्रमाणात बाजारात आली आणि तेथूनच दहा रुपयाचे नाणे बनावट असल्याची अफवा पसरली होती. (नगर प्रतिनिधी)