दोन घासांची सोय नाही.. म्हणे गणवेश आधी घ्या बाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 02:12 AM2017-08-10T02:12:06+5:302017-08-10T02:14:51+5:30

राहायला जागा नाही.. झोपडी दुसºयाच्या जागेवर आहे. त्यात विधवा आई अन् सहा चिल्यापिल्यांचा पोटभर जेवणाचा वांदा आहे.

There is no facility for two grasses. | दोन घासांची सोय नाही.. म्हणे गणवेश आधी घ्या बाई!

दोन घासांची सोय नाही.. म्हणे गणवेश आधी घ्या बाई!

googlenewsNext
ठळक मुद्देझोपडीतल्या चिल्यापिल्यांची त्रस्त आई : अर्धपोटी निजणाºयांच्या शिक्षणाची दुरवस्था उघड

संजय हनवते ।
लोकमत न्यूज नेटवर्क
हर्षी (पुसद) : राहायला जागा नाही.. झोपडी दुसºयाच्या जागेवर आहे. त्यात विधवा आई अन् सहा चिल्यापिल्यांचा पोटभर जेवणाचा वांदा आहे. आईला मजुरी मिळाली तर ठिक; नाहीतर उपवास ठरलेला. मुलांना दरवर्षी शाळेतून गणवेश मिळायचा. यंदा आधी स्वत: गणवेश घ्या, मग सरकार पैसे देईल, असा उफराटा निर्णय झाला. अन् झोपडीतल्या आईला रोजच्या उपवासासोबत मुलांच्या काळजीने घेरले आहे.
पुसद तालुक्यातील हर्षी येथील गंगाबाई शेषराव काळे या आईच्या पुढे शिक्षण विभागाने पेच निर्माण केला आहे. पण प्रश्न केवळ मुलांच्या गणवेशाचाच नाही, जगण्याचा आहे. मागच्या वर्षी पतीच्या अपघाती जाण्याने या कुटुंबातले सुखही कायमचे निघून गेले. पती शेषराव काळे २० एप्रिल २०१६ रोजी दुचाकीवर पुसदला जात असताना अपघात झाला. दोन दुचाकींची समारोसमोर धडक झाली. यात दोन्ही वाहनांवरील सात जणांचा मृत्यू झाला. त्यात शेषरावचाही बळी गेला. त्यांच्या मागे ८ मुली, १ मुलगा आहे. त्यांची जबाबदारी आता पत्नी गंगाबाईवर आहे. तीन मुलींचा विवाह आटोपला. आता ५ मुली आणि मुलाच्या पालनपोषणासाठी रोजमजुरी करण्याशिवाय गंगाबाईला पर्याय नाही. काम मिळाले नाही, तर उपाशीपोटी निजावे लागते.
मोठी मुलगी संजना सहावीत तर दिव्या पाचवीत शिकत आहे. इतर तीन भावंडं हर्षीच्या जिल्हा परिषद शाळेत आहेत. शाळा सुरू होऊन दीड महिना लोटला पण त्यांना गणवेशच नाही. घरच्या फाटक्या वेशात ते शाळेत जातात.
दरवर्षीप्रमाणे यंदाही शाळेतूनच मोफत गणवेश मिळेल ही आशा सरकारने फोल ठरविली. नव्या निर्णयानुसार, आधी गंगाबाईलाच मुला-मुलींना गणवेश घेऊन द्यावा लागणार आहे. खरेदीच्या पावत्या दाखवल्यावरच शाळेतून पैसे मिळणार आहेत. सहा लेकरांच्या पोटात दोन घास टाकण्याचेच वांदे असताना गणवेशासाठी २४०० रुपये कसे गोळा करणार, हा प्रश्न गंगाबाईपुढे उभा आहे. त्यातही गणवेशाचे पैसे मिळविण्यासाठी सहा मुलांचे सहा बँक खाते हवे. प्रत्येक खाते उघडण्यासाठी ५०० रुपये बँकेत जमा ठेवावे लागणार आहे. अशा अवस्थेत गंगाबाईच्या मुला-मुलींच्या शिक्षणाचे त्रांगडे होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
संजनाला शिकून अधिकारी व्हायचे आहे. तर दिव्याचा देशासाठी काहीतरी करण्याचा निश्चय आहे. शिक्षण विभागाने गंगाबाई काळे यांच्या अपत्यांसाठी माणूसकी दाखवून गणवेशाचे पैसे त्यांना द्यावे, अशी मागणी हर्षीवासीयांकडून करण्यात आली आहे.

मदत नाही, पेन्शन नाही.. विमाही दूरच
पतीचा मृत्यू झाल्यानंतर गंगाबाईला कोणतीही शासकीय मदत मिळाली नाही. विधवा पेन्शनही अद्याप सुरू झालेले नाही. कुटुंबप्रमुख गेल्यावर मिळणारी अनुदान रक्कमही मिळाली नाही. मोटार विमा दावा करण्यासाठी एका इसमाकडून खोडा घातला गेला. विम्याच्या प्रक्रियेपासून गंगाबाईला दूरच ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. राहायला घर नाही, जगायला काम नाही... उद्याचे भविष्य घडविण्यासाठी केवळ पोटच्या पोरांवरच गंगाबाईच्या आशा आहेत.
 

Web Title: There is no facility for two grasses.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.