२०४७ गावांमध्ये टंचाई जाहीर
By admin | Published: July 3, 2014 11:48 PM2014-07-03T23:48:32+5:302014-07-03T23:48:32+5:30
जिल्ह्यात मागील वर्षातील खरीप हंगामात खरीप पिकांची अंतिम पैसेवारी ५० पैसे किंवा त्यापेक्षा कमी असलेल्या गावांना टंचाई परिस्थितीतील गावे म्हणून घोषित करण्यात आले आहे. यामध्ये दोन हजार ४७ गावांचा
यवतमाळ : जिल्ह्यात मागील वर्षातील खरीप हंगामात खरीप पिकांची अंतिम पैसेवारी ५० पैसे किंवा त्यापेक्षा कमी असलेल्या गावांना टंचाई परिस्थितीतील गावे म्हणून घोषित करण्यात आले आहे. यामध्ये दोन हजार ४७ गावांचा समावेश आहे. टंचाई घोषित झालेल्या गावांमध्ये शासनाच्यावतीने विविध प्रकारच्या सवलती देण्यात येणार असून तसे आदेश संबंधित विभागांना देण्यात आले आहे.
गेल्या वर्षी जिल्ह्यासाठी खरीप हंगाम निराशाजनक गेला. बहुतांश शेतकऱ्यांना चांगल्या शेतीमालाची अपेक्षा असताना उत्पादनात घट आली. त्यामुळे या हंगामात जिल्ह्याची पैसेवारीही घसरली. जिल्ह्यातील ज्या गावांची गेल्या वर्षीच्या खरीप पिकांची अंतिम पैसेवारी ५० पैसे किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा गावांना टंचाई परिस्थितीतील गावे म्हणून घोषित करण्यात आले आहे. टंचाई घोषित गावांमध्ये यवतमाळ तालुक्यातील १३६ गावांचा समावेश आहे. कळंब तालुक्यातील १४०, बाभूळगाव १२७, आर्णी १०६, दारव्हा १४६, दिग्रस ८१, नेर १२१, पुसद १८८, उमरखेड १३६, महागाव ११४, केळापूर १३१, घाटंजी १०७, राळेगाव १३२, वणी १५७, मारेगाव १०८ आणि झरीजामणी तालुक्यातील ११७ गावांचा समावेश आहे.
टंचाई घोषित गावांमध्ये आठ प्रकारच्या अतिरिक्त सुविधा नव्याने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामध्ये जमिनी महसुलात सूट, सहकारी कर्जाचे रूपांतरण, शेतीच्या निगडीत कर्जाच्या वसुलीत स्थगिती, वीज बिलात ३३ टक्के सूट, परीक्षा शुल्कात माफी, रोजगार हमी योजनेंतर्गत घेण्यात येणाऱ्या कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकरचा वापर, टंचाईग्रस्त गावात शेतीपंपाची वीज जोडणी खंडित करण्यात येणार नाही आदी बाबींचा समावेश असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले आहे. शासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. (प्रतिनिधी)