आर्णीत पुन्हा अतिक्रमण होऊ नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 11:21 PM2017-11-22T23:21:35+5:302017-11-22T23:22:36+5:30
शहरात वाढत्या अतिक्रमणामुळे नागरिक त्रस्त होते. मंगळवारपासून नगर परिषद, महसूल, पोलीस आदी विभागांनी संयुक्तरीत्या अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्याला सुरुवात केली.
ऑनलाईन लोकमत
आर्णी : शहरात वाढत्या अतिक्रमणामुळे नागरिक त्रस्त होते. मंगळवारपासून नगर परिषद, महसूल, पोलीस आदी विभागांनी संयुक्तरीत्या अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्याला सुरुवात केली. यामुळे शहरातल रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. परंतु यापूर्वीचा अनुभव पाहता, काही दिवसातच पुन्हा अतिक्रमण होते. त्यामुळे यावेळी तरी रस्त्यांवर पुन्हा अतिक्रमण होऊ नये, याची काळजी प्रशासनाने घ्यावी, असे मत सर्वसामान्य आर्णीकर व्यक्त करीत आहे.
शहरात केवळ एकच मेनरोड असल्याने बाजारपेठ याच रोडवर आहे. त्यामुळे अतिक्रमणसुद्धा मोठ्या प्रमाणात याच रोडवर आहे. पादचारी, सर्वसामान्य नागरीक, विद्यार्थी, महिला, तथा म्हातारी माणसे यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. दरवर्षी या मेनरोडच्या दोन्ही बाजूच्या सार्वजनिक बांधकाम विभाग च्या हद्दीतील अतिक्रमण मोकळे केल्या जाते, नंतर मात्र परीस्थिती जैसे थे होते. यावेळी मात्र अतिक्रमण काढताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीतील तथा नगर परीषदचा सर्विस रोड हासुद्धा प्रथमच मोकळा करण्यात आला.
त्यामुळे शहरातील अनेक व्यापारी प्रतिष्ठाने तथा निवासस्थाने या रोडवर असल्याचे समोर आले, यांना यावेळी सक्तीने हटवण्यात आले आहे. यावेळी शहरात अतिक्रमण हटाव मोहीम काय असते, हे सर्वसामान्य लोकांना प्रथमच कळले आहे. या स्तरामधून या मोहिमेचे समर्थन सुद्धा करण्यात येत आहे.
नवीन आयएएस अधिकारी नगर परिषदेमध्ये मुख्याधिकारी म्हणून आल्यानंतर ही मोहीम यावेळी सक्तीने तथा मोठ्या प्रमाणात राबविण्यात आली. यामुळे आता रस्ते मोकळे झाले आहे. परंतु मोहीम संपल्यानंतर नगर परिषद गप्प राहणार का, पुन्हा अतिक्रमण तर होणार नाही, असे प्रश्न सामान्य नागरिकांना पडले आहे.