हरसूल येथील लोखंडी पूल वाहून गेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 10:15 PM2018-08-18T22:15:59+5:302018-08-18T22:16:35+5:30
तालुक्यातील हरसूल येथील अरुणावती नदीवरील लोखंडी पूल पुरात वाहून गेला. त्यामुळे हरसूल, गांधीनगर, आनंदवाडी व मोरखेड गावांचा संपर्क तुटला. हरसूल व परिसरात तब्बल २१६ मिमी पाऊस झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
दिग्रस : तालुक्यातील हरसूल येथील अरुणावती नदीवरील लोखंडी पूल पुरात वाहून गेला. त्यामुळे हरसूल, गांधीनगर, आनंदवाडी व मोरखेड गावांचा संपर्क तुटला.
हरसूल व परिसरात तब्बल २१६ मिमी पाऊस झाला. यामुळे अरुणावती नदीला पूर आला. या पुरात नदीवरील लोखंडी पूल वाहून गेला. परिणामी शेतात कामासाठी गेलेल्या शेतकरी व शेतमजुरांशी काही काळ संपर्क तुअला होता. त्यांना १५ किलोमीटरचा फेरा मारून आनंदवाडी, गांधीनगर मार्गे गावात पोहोचावे लागले. पुढील काही दिवस या गावातील नागरिकांना १५ किलोमीटरचा फेरा मारावा लागणार आहे. दरम्यान मुसळधार पाऊस होवूनही तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांच्यापैकी कुणीही कर्मचारी व अधिकारी गावाकडे फिरकले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे.
राठोड, देशमुख यांची भेट
तालुक्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी महसूल राज्यमंत्री संजय राठोड व माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांनी भेट दिली. त्यांनी दिग्रसमधील पूरस्थितीची पाहणी केली. राठोड यांनी नुकसानीचे तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.