बालपणातच तीनही भावंड झाली पोरकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 01:24 AM2017-07-25T01:24:33+5:302017-07-25T01:24:33+5:30
अगदी बालपणातच मायमाऊलीच्या अचानक जाण्याने ‘ते’ तिनही भावंडे पोरकी झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
कळंब : अगदी बालपणातच मायमाऊलीच्या अचानक जाण्याने ‘ते’ तिनही भावंडे पोरकी झाली. हृदय हेलावून टाकणाऱ्या घटनेनंतर त्या चिमुकल्यांचा आधारच कोलमडला. आई-वडिलांचे छत्र हरविलेले त्यांना आता आधाराची खरी गरज आहे.
येथील नगरपंचायतमध्ये हनुमंत चुड्डुके हे हंगामी स्वरुपात सफाई कामगार म्हणून कार्यरत होते. पाण्याच्या टाकीजवळ तो आपल्या पत्नीच्या मदतीने कुंटुंबासह एका छोट्याशा अतिक्रमण केलेल्या जागेतून जीवनाचे रहाटगाडगे हाकीत होते. प्रतीक्षा, शैला व सागर या तिन मुलांची जबाबदारी पेलत असतानाच आईला असाध्य आजार जडला. आजार बरा व्हावा, यासाठी पदरमोड करुन सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले. परंतु शेवटी नियतीने आपला डाव सहा वर्षापूर्वी साधलाच. तिनही मुले आईपासून पोरकी झाली. वडील हनुमंत यांनी आईची जागा घेण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. परंतु त्यांनी शेवटी हार माणून विषारी औषण प्राशन करुन आपली जीवनयात्रा संपविली.
आई-वडील दोघांनीही जगाचा निरोप घेतल्याने ही भावंडे आता पोरकी झाली. मोठी मुलगी प्रतिक्षा ही नुकतीच दहावी पास झाली. तिला ६०.२० टक्के इतके गुण आहे. शैला ही ९वीत शिकत असून सागर हा सातवीचा विद्यार्थी आहे. येथीलच शिवशक्ती विद्यालयात हे तिघेही भावंडे शिक्षण घेत आहे. घराजवळीलच नगरसेवक सुनिता डेगमवार, गिता ठाकरे व बबलु डुकरे यांनी त्यांना तुर्तास आश्रय दिला आहे.