आधीच कमतरता त्यात आणखी अडीचशे शिक्षकांचा पडणार खड्डा
By अविनाश साबापुरे | Published: June 18, 2023 07:28 PM2023-06-18T19:28:26+5:302023-06-18T19:28:39+5:30
सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर : नव्या भरतीसाठी बेरोजगारांनी घेतली समृद्धी महामार्ग रोखण्याची भूमिका
यवतमाळ : गेल्या दोन वर्षांपासून जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांचा प्रचंड तुटवडा पडलेला आहे. सध्या जिल्ह्यात मंजूर पदांपैकी तब्बल ११५७ शिक्षकांची कमतरता आहे. अशावेळी २५७ शिक्षक सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे खेड्यापाड्यांतील शिक्षकसंख्येत आणखी मोठा खड्डा पडणार असून विद्यार्थ्यांच्या पालकांचे मोर्चे जिल्हा परिषदेवर धडकण्याची शक्यता आहे.
शासनाच्या धोरणानुसार, सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या शिक्षकांची निवृत्ती प्रकरणे पाच सहा महिने आधीच तयार करून ठेवली जातात. त्यानुसार, जिल्ह्यात येत्या मार्च २०२४ पर्यंत तब्बल २५७ शिक्षक निवृत्त होत आहेत. यामध्ये सहा केंद्र प्रमुखांचा आणि तब्बल ५९ मुख्याध्यापकांचाही समावेश आहे. त्यामुळे अध्यापनासोबतच शाळांच्या पर्यवेक्षणाचाही प्रश्न गंभीर होणार आहे. शासनातर्फे लवकरच केंद्र प्रमुखांची ९० पदे भरली जाणार असली, तरी त्यानंतरही ७२ केंद्र प्रमुखांचा तुटवडा भासणारच आहे. अनेक शाळांचा कारभार आताच प्रभारी मुख्याध्यापकांवर चालतोय. त्यात सेवानिवृत्ती प्रकरणानंतर आणखी प्रभारीराज वाढणार आहे.
जिल्हा परिषद शाळांमध्ये आता सहायक शिक्षकांची ७ हजार ४६२ पदे मंजूर असताना केवळ ६ हजार ३०५ शिक्षकच कार्यरत आहेत. त्यातून काहींची आंतरजिल्हा बदली झालेली आहे. जिल्हा परिषद प्रशासनाच्या आकडेवारीनुसार सध्या ११५७ शिक्षक पदे रिक्त आहेत. आणखी २५७ जण निवृत्त होत असल्याने हा आकडा दीड हजारावर जाणार आहे. त्यामुळे विशेषत: महागाव, झरी, उमरखेड, घाटंजी, वणी, मारेगाव, पांढरकवडा आदी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये अध्यापनाचा गंभीर पेच निर्माण होणार आहे.
नव्या भरतीवर सर्वांच्याच नजरा
दरम्यान, नवी शिक्षक भरती करण्याबाबत राज्य शासनाने हालचाली सुरू केल्या. परंतु, डीएड, बीएड धारकांची अभियोग्यता चाचणी घेतल्यानंतर अजूनही भरती प्रक्रियेसाठी पवित्र पोर्टल सुरू करण्यात आलेले नाही. शिक्षक संचमान्यतेनंतर ही प्रक्रिया सुरू करण्याचे सूतोवाच प्रशासनाने केले होते. परंतु, आता संचमान्यतेनंतरही पोर्टलच्या हालचाली दिसत नसल्याने बेरोजगार उमेदवार आक्रमक झाले आहेत. येत्या २३ जूनपर्यंत ५५ हजार शिक्षक भरती एकाच टप्प्यात करण्यासाठी निर्णय न झाल्यास समृद्ध महामार्ग रोखून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
निवृत्त होणारे शिक्षक
एप्रिल : २७
मे : २८
जून : ६०
जुलै : ३२
ऑगस्ट : १९
सप्टेंबर : १२
ऑक्टोबर : २०
नोव्हेंबर : ०७
डिसेंबर : १३
जानेवारी : १०
फेब्रुवारी : १३
मार्च : १७
जिल्ह्यातील रिक्त पदांची स्थिती
संवर्ग : मंजूर : रिक्त
सहायक शिक्षक : ७४६२ : ११५७
मुख्याध्यापक : ४२४ : ७५
केंद्र प्रमुख : १८० : १५६