संमेलनातून प्रतिभावंत साहित्यिक घडतील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 10:49 PM2018-03-05T22:49:44+5:302018-03-05T22:49:44+5:30
बाल साहित्य संमेलन हे बालकांच्या सुप्त गुणांना वाव देणारे व्यासपीठ आहे. या संमेलनातून भविष्यात नक्कीच प्रतिभावंत साहित्यिक घडतील. बालकांच्या व्यक्तिमत्व विकासाकरिता बाल साहित्य संमेलनाची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन राजुदास जाधव यांनी केले.
आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : बाल साहित्य संमेलन हे बालकांच्या सुप्त गुणांना वाव देणारे व्यासपीठ आहे. या संमेलनातून भविष्यात नक्कीच प्रतिभावंत साहित्यिक घडतील. बालकांच्या व्यक्तिमत्व विकासाकरिता बाल साहित्य संमेलनाची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन राजुदास जाधव यांनी केले.
यवतमाळ तालुक्यातील येळाबारा येथे टाटा ट्रस्ट, वर्ल्ड व्हिजन इंडिया, जनसेवा ग्रामीण विकास व शिक्षण प्रतिष्ठान आणि २१ गावातील शाळा व्यवस्थापन समिती फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दुसºया बाल साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. भविष्यात शासन पातळीवरसुद्धा अशा आगळ्यावेगळ्या संमेलनाची दखल शासनाने घेतली पाहिजे, कारण याच बालकांमधून पुढे समाज परिवर्तन करणारे साहित्यिक निर्माण होणार आहे, असेही राजुदास जाधव योवळी म्हणाले.
मुलांनी स्वत: लिहिलेल्या कविता आणि काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन संमेलनस्थळी लावले होते. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल ठाकरे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. यावेळी जिल्हा शेतकरी वारकरी संघटनेचे अध्यक्ष सिकंदर शाह, पंचायत समिती सदस्य सूमन गावंडे, राजू गावंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. वर्ल्ड व्हिजन प्रकल्पचे संचालक राजेंद्र सूर्यवंशी, शाळा व्यवस्थापन समिती फेडरेशनचे अध्यक्ष मनोहर विरूडकर, जनसेवा ग्रामीण विकास व शिक्षण प्रतिष्ठानचे अध्यक्ष मनोज भोयर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
प्रास्ताविक सुनील भेले यांनी केले. संचालन व आभार संतोष पिंगळे यांनी मानले. व्यवस्थापन आकाश चंदनखेडे यांनी सांभाळले. प्रा. घनश्याम दरणे, सुनील कदम यांच्या उपस्थितीत संमेलनाचा समारोप झाला.
६४ बालकवींच्या कविता
संमेलनात ६४ बालकवींनी विविध विषयांवर आपल्या कविता सादर केल्या. पाठ्यपुस्तकातील पाठावर पपेटसारख्या विविध माध्यमाने नाट्यकर, माध्यमांतर सादर करण्यात आले होते. काव्यसंमेलनाचे संचालन संबोधी भेले हिने केले. चित्रकाव्य प्रदर्शन पाहण्यासाठी एकच झुंबड उडाली होती.
शाळा बंद धोरणाचा निषेध
संमेलनात विविध ठराव घेण्यात आले. हातगाव येथील यश बल्की यांनी ३० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याच्या शासन धोरणाचा निषेध करण्यात येत आहे आणि शाळा व्यवस्थापन समिती फेडरेशनच्या आंदोलनास पाठिंबा देत आहे, असा ठराव मांडला. बाल साहित्य संमेलनाचे शासनस्तरावर आयोजन व्हावे, असाही ठराव घेतला गेला.