हे सुरांनो चंद्र व्हा..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 01:52 AM2017-11-26T01:52:19+5:302017-11-26T01:52:43+5:30
अविनाश साबापुरे ।
ऑनलाईन लोकमत
यवतमाळ : आॅर्केस्ट्रॉ, लावणी ऐकण्यासाठीही आता पूर्वीसारखे रसिक गर्दी करीत नाही. अशा बदलत्या काळात चक्क शास्त्रीय संगीत ऐकण्यासाठी हजारो श्रोत्यांची रेटारेटी झाली. ‘कट्यार काळजात घुसली’ फेम महेश काळे यांच्या सुरांनी हा चमत्कार घडविला. स्वातंत्र्यसंग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा यांच्या स्मृतिसमारोहानिमित्त शुक्रवारी सायंकाळी येथील प्रेरणास्थळावर ‘स्वरांजली’ कार्यक्रम रंगला. आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या गायकाचा एकेक नजराणा ऐकताना दर्दी रसिकांची गर्दी तृप्त झाली.
हे सुरांनो चंद्र व्हा
चांदण्यांचे कोष माझ्या
प्रियकराला पोचवा
महेश काळे यांनी सुरांना घातलेली ही साद प्रत्यक्षात रसिकांनाच केलेले आवाहन होते. म्हणूनच महेश यांच्यासोबतच प्रत्येक रसिकही गात होता. महेश यांच्या सुरांनी प्रेरणास्थळावरील गर्दीच्या काळजात सुरावटींचे कोष पोहोचविले होते. आधी शास्त्रीय रचना गातो, नंतर तुम्ही सांगाल ते गाईल.. म्हणत महेश यांनी भूप रागातील बंदिशीने मैफलीचा श्रीगणेशा केला. ‘गाय भूपाली सकल मिन स्वर शांत सोहे’ ही पहिली ओळ आळताच टाळ्यांचा कडकडाट झाला. हजारो श्रोते कानात प्राण आणून ऐकू लागले, तर हजारो प्रेक्षक ‘मोबाईलचा कान’ करून महेशचे स्वर रेकॉर्ड करू लागले...
सूर निरागस हो गणपती
शुभनयना करुणामय
गौरीहर श्री वरदविनायक
ओंकार गणपती, अधिपती
सुखपती, छंदपती, गंधपती
लीन निरंतर हो
सूर निरागस हो...
‘कट्यार काळाज घुसली’ चित्रपटात गाजलेले हे महेश काळे यांचे गाणे साक्षात ऐकताना रसिकांची ब्रह्मानंदी टाळी लागली. टिपेला पोहोचणारा महेश यांचा स्वर रसिकांच्या रसिकतेलाही वेगळ्या उंचीवर घेऊन गेला. ‘मोरया मोरया मोरया’ आळवताना तर प्रेरणास्थळी हजारो सुरांचा सोहळा अनुभवायला मिळाला.
रसिक आणि गायकाचे हे तादात्म्य निर्माण झाल्यावर महेश काळे यांनी हळूवार संवाद साधत शास्त्रीय संगीताचे महत्त्व गर्दीच्या गळी उतरवणे सुरू केले. तीन भाऊ तीन वेगवेगळ्या वातावरणात वाढले तर त्यांना एकच रचना कशी आवडेल? पण ती एकच रचना तीन वेगवेगळ्या रसिकांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने सादर करण्याची किमया महेश यांनी करून दाखविली...
मी निष्कांचन निर्धन साधक
वैराग्याचा मी तो उपासक
हिमालयाचा मी एक यात्रिक
मनात माझ्या का उपजावे संसाराचे प्रेम...
देवा घरचे ज्ञान तुला लाभे
ही रचना शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, भावगीत अशा वेगवेगळ्या ढंगात सादर झाली, तेव्हा गर्दीतले आबालवृद्ध मंत्रमुग्ध झाले. गुरू पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्याविषयी कृतज्ञता म्हणून महेश काळे यांनी त्यांच्या विविध रचनांची झलक पेश केली. एकाच गाण्यात गझल, लोकगीत, नाट्यगीत, भावगीत, अभंग, ठुमरी अशा रचनांची ही ‘गुंफण’ चमत्कृतीपूर्ण ठरली. ‘गोमू माहेरला जाते हो नाखवा’ कधी संपले हे कळण्याच्या आधीच ‘लागी करजवा कटार सावरीयासे नैना हो गए चार’ सुरू झाले तेव्हा रसिकांना सुखद धक्का बसला. ‘आम्हा न कळे ज्ञान न कळे पुराण वेदांचे वचन न कळे आम्हा’ हा अभंग मांडतानाच ‘शब्दावाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले’ हे भावगीत महेश यांच्या काळजातून पाझरले. कानडा राजा पंढरीचा, घेई छंद मकरंद, सर्वात्मका शिवसुंदरा अशा फर्माइशी पूर्ण करता-करता महेश काळे यांच्या सुरांनी प्रत्येकाच्या ‘मन मंदिरा’त ‘संवादी सहवेदना’ पोहोचविली.
श्रोत्यांच्या रसिकतेला गायकाची दाद!
स्वरांजली : बाबूजींचा स्मृतिसमारोह
यवतमाळ : स्वातंत्र्यसंग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा यांचा स्मृतिसमारोह आगळ्यावेगळ्या ‘स्वरांजली’ कार्यक्रमामुळे चिरस्मरणीय झाला.
आंतराष्ट्रीय ख्यातीचे गायक महेश काळे यांच्या सुरांनी वातावरणाला वेगळा आयाम दिला. मी कुणी महागायक नाही, अजूनही विद्यार्थीच आहे. इथे (प्रेरणास्थळावर) आजवर येऊन गेलेले खरे महागायक आहेत. त्यांनी दाखविलेल्या मार्गावर चालण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करतोय... अशी सुरूवात करणाºया महेश काळे यांनी सुरांच्याही आधी शब्दांची साखर पेरली. पहिल्याच रचनेत एक आलाप रसिकांच्या काळजाला भिडला आणि टाळ्यांचा पाऊस पडला. तेव्हा महेश यांनी रसिकांनाच दाद दिली ती अशी, ‘साधारणत: एखादी तान घेतली किंवा काहीतरी चामत्कारिक हरकत घेतली तरच टाळ्या पडतात. पण तुम्ही माझ्या आलापाला दाद देताय. हा माझ्या गाण्याचा मोठेपणा नव्हे, तुमच्या रसिकतेची ही ओळख आहे.’
गर्दीला शिकविले अन् वदविलेही!
शास्त्रीय संगीत ऐकण्यासाठी हजारो रसिक जमले आणि शेवटपर्यंत एकही रसिक जागचा हलला नाही, त्याची मेख दडली होती महेश काळे यांच्या संवादी सादरीकरणात. रचना पेश करताना ते कोणत्या रागाचे लक्षणगीत आहे, त्याचा ताल कोणता आहे एवढे सांगूनच ते थांबले नाहीत. तर रसिकांना त्यांनी गाण्याचे स्वर समाजावून सांगितले, आपल्या पाठोपाठ म्हणायला लावले. आपले शरीर गात्रवीणा आहे, म्हणून विशिष्ट स्वर गाताना शरीराची विशिष्ट हालचाल होते. अशी बारीकसारीक गुपिते त्यांनी रसिकांशी शेअर केले. सुर, ताल सांगत-सांगत महेश यांनी आपल्या पाठोपाठ एकेक स्वर गायचा कसा हेही शिकविले. अन् रसिकही आनंदाने गात होते.
भावपूर्ण श्रद्धांजली
कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वातंत्र्यसंग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी ख्यातनाम गायक महेश काळे, नगराध्यक्ष कांचन चौधरी, बाळासाहेब चौधरी, लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन विजय दर्डा, लोकमतचे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा, लोकमतचे कार्यालय प्रमुख किशोर दर्डा यांची प्रमुख उपस्थिती होती. महेश काळे यांच्यासह साथसंगत करणारे निखिल फाटक (तबला), प्रसाद जोशी (पखवाज), उद्धव कुंभार (तालवाद्य), रमाकांत परांजपे (व्हायोलिन), राजीव तांबे (हार्मोनियम) या वाद्यवृंदांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अजय कोलारकर यांनी केले. तर लोकमतचे कार्यालय प्रमुख किशोर दर्डा यांनी कलावंतांसह सर्व उपस्थितांचे आभार मानले.