रस्ता विचारून केला घात; दुचाकीवर आले, महिलेच्या मानेला चाकू लावून लुटले

By विलास गावंडे | Published: September 9, 2023 04:47 PM2023-09-09T16:47:38+5:302023-09-09T16:48:04+5:30

१२ किलोमीटर पायदळ प्रवास करत गाठले पोलिस ठाणे

they came on a bike, put a knife on the woman's neck and robbed her | रस्ता विचारून केला घात; दुचाकीवर आले, महिलेच्या मानेला चाकू लावून लुटले

रस्ता विचारून केला घात; दुचाकीवर आले, महिलेच्या मानेला चाकू लावून लुटले

googlenewsNext

नेर (यवतमाळ) : रस्ता कुठे जातो अशी विचारणा करून शेतात थांबलेल्या महिलेला दोन दुचाकीस्वारांनी लुटल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास इंद्रठाणा येथे घडली. घाबरलेली महिला व तिच्या पतीने तब्बल १२ किलोमीटर पायदळ प्रवास करत नेर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. 

छाया सुरेश महल्ले (३९) रा. टोलीपुरा, नेर, (मूळ गाव इंद्रठाणा) असे या महिलेचे नाव आहे. त्यांचे इंद्रठाणा - दहीफळ मार्गावर शेत आहे. त्या पतिसह शेतात गेल्या होत्या. सायंकाळी गावाकडे निघण्यासाठी पतीची वाट पाहात शेताच्या फाटकाजवळ थांबल्या. त्यावेळी दोन दुचाकीवर सहा जण आले. त्यांनी छाया महल्ले यांना हा रस्ता कुठे जातो, अशी विचारणा केली. त्याचवेळी त्यांनी या महिलेच्या गळ्याला चाकू लावला. तोंड दाबून त्यांच्या गळ्यातील डोरले, गहूमनी पुंगळ्या, सोन्याचे बारिक मनी, नाकातील बेसर, असा २० हजार ३५० चा ऐवज लुटला. लुटारू मोटरसायकलसह पळून गेले. झटापटीत छाया महल्ले यांना इजाही झाली. 

घटनेनंतर छाया व त्यांच्या पतीने पायदळ प्रवास करून पोलिस ठाण्यात तक्रार दिली. लुटमार करणाऱ्यांजवळ एक लाल रंगाची, तर दुसरी काळ्या रंगाची मोटरसायकल होती, अशी माहिती महिलेने पोलिसांना दिली. याची नेर पोलिसांनी गांभीर्याने दखल घेत तक्रारीतील माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवून सहा जणांना ताब्यात घेतले.  

ठाणेदार बाळासाहेब नाईक, किशोर खंदार, मनोहर पवार, नरेंद्र लावरे, राजू चौधरी, पवन ढवळे, रामधन पवार यांनी लुटारूंना पकडण्यासाठी परिसर पिंजून काढला. शोध सुरू असताना एका शेतात दडून बसलेल्या सहा सशयितांना ताब्यात घेण्यात आले. ते दारव्हा परिसरातील असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ताब्यात घेण्यात आलेल्या सहा जणांकडून एमएम १२- बीटी ७७२९ आणि एमएच २९ - एम ९६४२ या क्रमांकाची दुचाकी ताब्यात घेतली. ताब्यात घेण्यात आलेल्या सहा जणांची कसून चौकशी सुरू करण्यात आली आहे.

Web Title: they came on a bike, put a knife on the woman's neck and robbed her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.