रस्त्याच्या दुर्दशेमुळे त्यांना भोगाव्या लागतात नरकयातना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:47 AM2021-09-21T04:47:50+5:302021-09-21T04:47:50+5:30
महागाव : तालुक्यातील मलकापूर व चिखलीवासीयांना रस्त्याच्या दुर्दशेमुळे नरकयातना भोगाव्या लागत आहे. रस्ता दयनीय झाल्याने ग्रामस्थ हवालदिल झाले आहे. ...
महागाव : तालुक्यातील मलकापूर व चिखलीवासीयांना रस्त्याच्या दुर्दशेमुळे नरकयातना भोगाव्या लागत आहे. रस्ता दयनीय झाल्याने ग्रामस्थ हवालदिल झाले आहे.
१५ वर्षांपूर्वी पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत रस्ता बांधणीचे काम करण्यात आले. मात्र, रस्त्याची देखभाल व दुरुस्ती न झाल्याने आता रस्त्याची खस्ता हालत झाली आहे. पावसाळ्यात दरवर्षी नागरिकांना खड्ड्यासह चिखलातून ये-जा करावी लागत आहे. रस्त्यासाठी ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधींना वारंवार पत्र दिले. नवीन रस्त्याची मागणी केली. परंतु त्यांची मागणी बेदखल करण्यात आली.
मतांचा जोगवा मागण्यासाठी लोकप्रतिनिधी गावात एकदा येतात. नंतर त्यांना गावाचा विसर पडतो. त्यामुळे आता सुविधांसाठी शासनस्तरावरून दखल घेण्याची गरज असल्याचे गावकरी सांगतात. रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस दयनीय होत असून साधे पायदळ चालणेसुद्धा कठीण झाले आहे.
बॉक्स
लोकवर्गणीतून बुजविले खड्डे
रस्ता किमान चालण्यायोग्य व्हावा म्हणून काही ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून खड्डे बुजविले. मात्र, गावातील कुणी आजारी पडल्यास त्यांना दवाखान्यात न्यायचे झाल्यास नेता येत नाही. विद्यार्थ्यांना दररोज शाळेत ये-जा करण्यासाठी त्रास होतो. जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेऊन रस्त्याचा प्रश्न निकाली काढावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
200921\img-20210919-wa0047.jpg
लोकं सहांगतून रस्त्याचे खड्डे बुजवितांना मलकापूर चिखली येथील नागरिक