डोक्याला बंदूक लावून रेती घाट चालकाला मागितली पाच लाखांची खंडणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 06:02 PM2023-09-14T18:02:46+5:302023-09-14T18:03:31+5:30

सहकारी व मजूर आल्याने वाचले प्राण, प्रमुख आरोपीला अटक, साथीदार मात्र फरार

They put a gun to the head and demanded a ransom of 5 lakhs from the Sand Ghat driver | डोक्याला बंदूक लावून रेती घाट चालकाला मागितली पाच लाखांची खंडणी

डोक्याला बंदूक लावून रेती घाट चालकाला मागितली पाच लाखांची खंडणी

googlenewsNext

मारेगाव (यवतमाळ) : तक्रारी करूनही कोसारा येथील रेती घाट धारक भाव देत नसल्याने अखेर रेतीघाट धारकाच्या डोक्यावरच बंदूक रोखून पाच लाख रूपये नगदी आणि दर महिन्याला दोन लाख रुपये हप्ता, अशी खंडणीची मागणी करण्यात आली. रेतीघाट चालकाचे सहकारी वेळीच धावून आल्याने पुढील अनर्थ टळला.

हा थरार मारेगाव तालुक्यातील कोसारा येथील रेती घाटावर बुधवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडला. या संदर्भात रेती घाट चालक सैय्यद मन्सूर सैय्यद दाऊद (रा.भोसा रोड, यवतमाळ) यांच्या तक्रारी वरून आरोपी ललित उर्फ लल्ल्या अरुण गजभीये (रा.विदर्भ हाऊसिंग सोसायटी यवतमाळ) याला मारेगाव पोलिसांनी अटक केली. त्याचा सहकारी मात्र अद्यापही फरार आहे.

सैय्यद मन्सूर सैय्यद दाऊद यांनी सन २०२२-२३ या वर्षासाठी वर्धा नदीवरील कोसारा घाट लिलावात घेतला आहे. शासकीय नियमानुसार ते रेतीचा साठा व वितरण करीत आहेत. दरम्यान, ३० ऑगष्ट रोजी रेती घाटावर दिवाणजी म्हणून काम करणाऱ्या विकास झंजाळ यांना फोन करून पाच लाखांची खंडणी मागण्यात आली. पैसे न दिल्यास जिल्हाधिकारी आणि शासनाच्या आपले सरकार पोर्टलवर तक्रार करण्याची धमकी दिली. त्यानंतरही हेतू साध्य न झाल्याने वणी येथील साथीदाराच्या मदतीने जिल्हाधिकारी आणि शासकीय पोर्टलवर तक्रार करण्यात आली. या तक्रारीनुसार मारेगाव व यवतमाळ येथील तहसीलदारांनी घाटावर जाऊन पाहणी केली. परंतु शासकीय नियमाचे कुठेही उल्लंघन नसल्याने सैय्यद मन्सून सैय्यद दाऊद यांच्या यवतमाळ येथील गिट्टी खाण आणि कोसारा रेती घाटावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.

अशातच रेती घाट चालक सैय्यद मन्सूर सैय्यद दाऊद हे १३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७. ३० वाजताच्या सुमारास रेती घाटापासून काही अंतरावर लिंबाच्या झाडाखाली चार सहकाऱ्यांसोबत रेती घाटाबद्दल चर्चा करीत उभे असताना पांढऱ्या रंगाच्या कारने त्या ठिकाणी ललित उर्फ लल्ल्या अरुण गजभीये हा एका अनोळखी सहकाऱ्यासोबत आला. त्या ठिकाणी सहकाऱ्यासह उभ्या असलेल्या सैय्यद मन्सूर सैय्यद दाऊद यांना बाजुला बोलावले आणि डोक्याला पिस्तूल लावून पाच लाख रुपये नगदी आणि दोन लाख रुपये दर महिन्याला हप्ता म्हणून द्यायचे, असा सज्जड दम दिला. या वेळी आरोपीच्या सहकाऱ्याने फिर्यादीच्या पोटावर चाकू लावून आतडी बाहेर काढण्याची धमकी दिली.

सहकारी धावून आल्याने अनर्थ टळला

डोक्यावर बंदूक लावल्याचे लक्षात येताच, बाजुलाच उभे असलेले सैय्यद मन्सूर सैय्यद दाऊद यांचे सहकारी धावून आले. एकूणच परिस्थिती लक्षात घेऊन आरोपीच्या सर्व मागण्या मान्य केल्या. पैसा व हप्ता देण्याचे आश्वासन मिळाल्याने आरोपी लल्ल्या गजभिये आपल्या सहकाऱ्यासह निघून गेला. हादरलेल्या सैय्यद मन्सूर सैय्यद दाऊद यांनी सहकाऱ्यांसह मारेगाव पोलीस ठाणे गाठून आपबिती कथन केली. पोलिसांनी घटनेचे गांभिर्य लक्षात घेता मारेगाव पोलिसांचे पथक पाठवून आरोपीला अटक केली. घटनेत वापरलेली बंदूक आणि अनोळखी व्यक्ती मात्र पोलिसांचे हाती लागले नाही. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

Web Title: They put a gun to the head and demanded a ransom of 5 lakhs from the Sand Ghat driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.