रेल्वे लिपिकेचा पतीच निघाला चोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 10:09 PM2019-02-22T22:09:33+5:302019-02-22T22:10:05+5:30
स्थानिक रेल्वे स्टेशनवर बुधवारी रात्री तब्बल ३ लाख ६१ हजारांची चोरी झाली होती. तिकीट काऊंटरवरची तिजोरी उघडून रोख लंपास केली. या गुन्ह्यात रेल्वेतील लिपिकेचाच पती आरोपी असल्याचे पोलिस तपासात उघड झाले. टोळीविरोधी पथकाने चोरट्या पतीला शुक्रवारी अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : स्थानिक रेल्वे स्टेशनवर बुधवारी रात्री तब्बल ३ लाख ६१ हजारांची चोरी झाली होती. तिकीट काऊंटरवरची तिजोरी उघडून रोख लंपास केली. या गुन्ह्यात रेल्वेतील लिपिकेचाच पती आरोपी असल्याचे पोलिस तपासात उघड झाले. टोळीविरोधी पथकाने चोरट्या पतीला शुक्रवारी अटक केली.
योगेश रमेश पटेल (३९) रा. नागपूर असे आरोपीचे नाव आहे. त्याची पत्नी यवतमाळ रेल्वे स्थानकावर कार्यरत आहे. त्यामुळे रेल्वेच्या कॅश काऊंटरवर त्याची नेहमी ये-जा होती. येथील कॅश, तिजोरीच्या चाव्या कुठे असतात याची माहिती असल्याने त्याने बुधवारी गुन्हा केला. याची गोपनीय माहिती पोलिस उपनिरीक्षक संतोष मनवर यांना मिळाली. शिवाय घटनास्थळावर रेल्वेच्या तिकीट काऊंटरचे मुख्य गेट तोडून आरोपीने तिजोरी फोडली नाही तर ती सहज उघडलेली दिसली. हा धागा पकडून तपास सुरू केला.
आरोपी यवतमाळात दारव्हा नाका परिसरात असल्याची माहिती मिळताच मूर्तिजापूर रेल्वे पोलिसांना सोबत घेऊन टोळीविरोधी पथकाने सापळा रचला. शुक्रवारी आरोपीला ताब्यात घेतले असता, त्याच्या जवळ रोख १५ हजार व एक मोबाईल मिळाला. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीने चोरीच्या रकमे पैकी २ लाख २५ हजार रूपये बँक खात्यात जमा केल्याचे सांगितले. यावरून त्याला अटक करून रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.