कारची काच फोडून साडेतीन लाख उडविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2021 11:22 AM2021-11-24T11:22:02+5:302021-11-24T12:01:13+5:30
पार्क केलेल्या कारची मागील काच फोडून चोरट्यांनी सीटवर ठेवलेली साडेतीन लाखांची रोख रक्कम लंपास केली.
यवतमाळ : शहरातील तिरंगा चाैकातील एका बँकेतून रोख रक्कम काढून त्यांनी कारमध्ये ठेवली. ही कार धामणगाव मार्गावरील समाजकार्य महाविद्यालयाच्या आवारात पार्क केली. याच संधीचा फायदा घेत चोरट्याने साडेतीन लाख रुपयांची रोख काच फोडून अलगद लंपास केली. ही घटना मंगळवारी दुपारी १ च्या दरम्यान घडली.
पवन ठाकरे हे समाजकार्य महाविद्यालयात अधीक्षक आहेत. त्यांनी मित्राला हातउसने देण्यासाठी ही रक्कम बँकेतून काढली. ते (एमएच २९/एन. ९०८५) क्रमांकाच्या कारने तिरंगा चाैकात पोहोचले. तेथे एका बँकेतून सव्वालाख रुपये काढले. शिवाय सोबत घरून आणलेले सव्वादोन लाख अशी साडेतीन लाखांची रोकड गाडीत ठेवली. पैसे घेण्यासाठी मित्र बाहेरगावाहून येणार होता. त्यामुळे ते कार घेऊन समाजकार्य महाविद्यालयात गेले. तेथे आपले काम करीत होते.
काही वेळाने महाविद्यालयातील चाैकीदाराने कारची काच फुटल्याची माहिती ठाकरे यांना दिली. ते तत्काळ कारजवळ पोहोचले. आरोपीने कारची मागील काच फोडून सीटवर ठेवलेली रोख रक्कम लंपास केली. चोरी झाल्याचे लक्षात येताच ठाकरे यांनी शहर पोलीस ठाणे गाठले. ठाकरे यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रवींद्र मस्कर करीत आहेत. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली.
बँकेसमोर पाळत ठेवणारे सक्रिय
बँक परिसरात उभे राहून पाळत ठेवणारे पुन्हा शहरात सक्रिय झाले आहेत. गेल्या काही वर्षांत पाळत ठेवून रोकड चोरीचा गुन्हा घडला नाही. मात्र मंगळवारी दुपारी त्याची पुनरावृत्ती झाली आहे. तेव्हा बँकेत रोखीचे व्यवहार करून बाहेर पडताना सावधगिरी बाळगावी, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.