दोन मोटरसायकलीसह चोरटा पोलिसांच्या जाळ्यात; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
By विशाल सोनटक्के | Published: March 24, 2023 05:11 PM2023-03-24T17:11:14+5:302023-03-24T17:11:42+5:30
चोरीची मोटारसायकल विकत होता पाच हजारात
यवतमाळ : शहरातून मोटारसायकलची चोरी करून ती पाच हजार रुपयात विक्री करण्याचा प्रयत्न करीत असलेल्या एका चोरट्याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्याकडून सुमारे ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याला पुढील तपासकामी अवधूतवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गुरुवारी पेट्रोलिंग करीत असताना त्यांंना माहिती मिळाली की, पांढरकवडा रोडवरील रिलायन्स पेट्रोल पंपासमोर एकजण चोरीची मोटारसायकल पाच हजार रुपयात विकण्याचा प्रयत्न करीत आहे. पथकाने माहिती मिळताच रिलायन्स पेट्रोल पंप परिसरात सापळा रचून सत्यम संजय चोरडिया (२५) रा. साईमंदिरजवळ गिरीजानगर यवतमाळ यास मोटारसायकलसह ताब्यात घेतले. त्याची कसून विचारपूस केली असता त्याने सदर मोटारसायकल आठवडी बाजारातील देवी मंदिराजवळून चोरल्याचे सांगितले.
चोरडिया याच्याकडे आणखी एक मोटारसायकल आढळली. ही मोटारसायकल त्याने तो राहत असलेल्या गिरीजानगर भागातून चोरल्याची कबुली दिली. त्यानुसार सुमारे ६० हजार रुपये किमतीच्या या दोन्ही मोटारसायकली पोलिसांनी जप्त केल्या. या प्रकरणी अवधूतवाडी पाेलिस ठाण्यात सत्यम चोरडियाविरुद्ध कलम ३७९ भादंविनुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपासकामी त्याला अवधूतवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
चोरीची घटना घडल्यास तत्काळ फिर्याद द्या
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रदीप परदेशी, सहायक पोलिस निरीक्षक विवेक देशमुख, उपनिरीक्षक राहुल गुहे, साजीद सय्यद, बंडू डांगे, अजय डोळे, रुपेश पाली, नीलेश राठोड, विनोद राठोड, रितुराज मेढवे, धनंजय श्रीरामे आणि जितेंद्र चौधरी यांच्या पथकाने चोरट्यास अटक केली. दुचाकी चोरीची घटना घडल्यानंतर तत्काळ पोलिस ठाण्यात फिर्याद द्यावी, असे आवाहनही पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.